Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एरंडोल शिवसेनेत ३२ वर्षानंतर बंडखोरीची पुनरावृत्ती

Sampat Devgire

आल्हाद जोशी

एरंडोल : शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) पहिल्या दिवसांपासून त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी अद्याप संभ्रमावस्थेत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. (Shivsena`s both MLA join rebel group)

या राजकीय घडामोडींमुळे १९९० मध्ये तत्कालीन आमदार हरिभाऊ महाजन यांनी छगन भुजबळ यांच्यासोबत केलेल्या पक्षांतराच्या आठवणींना जुन्या जाणकारांकडून उजाळा मिळत आहे.

एरंडोल तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शहरातील आठवडे बाजारातील शिवसेना कार्यालयात नुकताच पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर दोनच दिवसांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली. आमदार चिमणराव पाटील यांना मतदारसंघातील विकासकामांसाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यामुळे आमदार चिमणराव पाटील पहिल्या दिवसापासून शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी डॉ. हर्षल माने यांची निवड करण्यात आल्याने आमदार चिमणराव पाटील पक्षनेतृत्वावर नाराज होते. जिल्हा प्रमुखांची निवड असताना मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी देखील विश्वासात घेतले जात नसल्याने आमदार चिमणराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

पदाधिकाऱ्यांना धक्का

शिवसेनेचा वाघ अशी ज्यांची राज्यात ओळख आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनावणे, मुक्ताईनगरचे आमदार तथा जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे चांगले स्थान निर्माण केले आहे. या सर्वांची कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धास्थानी मानणारे निष्ठावान पदाधिकारी म्हणून ओळख होती.

मात्र, पक्षाच्या चारही आमदारांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार चिमणराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी, या संभ्रमात सर्व जण आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. जवळपास सर्वच जण ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

पक्षनिष्ठेने घडले होते दर्शन

विधानसभा निवडणुकीत १९९० मध्ये उत्तर महाराष्ट्रातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव आमदार हरिभाऊ महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत पक्षांतर करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ३२ वर्षांपूर्वी झालेल्या पक्षांतराच्या घटनेचे अनेक साक्षीदार आजही आहेत. आमदार महाजन यांनी केलेल्या पक्षांतरामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ठिकठिकाणी निषेध केला होता. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्या एरंडोल दौऱ्याप्रसंगी निष्ठावान शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री भुजबळ यांच्या कार्यक्रमाला विरोध करून आपली पक्षावरील निष्ठा दाखवून दिली होती. आता पुन्हा तोच कित्ता घडत असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT