Rahul Dhikle at Farmers agitation Sarkarnam
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनातून आमदार राहुल ढिकलेंचा राष्ट्रवादीला ‘शॉक’

टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्यांची आमदार राहुल ढिकलेंकडून समजूत

Sampat Devgire

म्हसरूळ : अनियमित आणि अचानक वीजपुरवठा खंडित (Power supply) केला जात असल्याने संतप्त झालेल्या सय्यद पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी (Farmers) रविवारी थेट विजेच्या उच्च दाबवाहिनीच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. त्याचा व्हीडीओ सोशल मिडीयार व्हायरल झाला. हे समजताच आमदार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikle) यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीने सिद्धपिंप्री व आजूबाजूच्या गावांतील वीजपुरवठा अचानक खंडित केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात राहावे लागले. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागले. याविरोधात शेतकऱ्यांनी रविवारी उच्चदाबाच्या वीज टॉवरवर चढून आंदोलन केले. या आंदोलनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले.

काही तासांतच या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू झाली. त्यामुळे आंदोलनाची माहिती कळताच आमदार ढिकले यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. तेथील आंदोलकांसह शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व महावितरण अधिकाऱ्यांना या संदर्भात तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले. या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोपर्यंत वीज येत नाही, तोपर्यंत जागेवरून हलणार नसल्याची भूमिका मांडली.

यादरम्यान महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आज शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून आंदोलन करावे लागले याचा तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया या वेळी आमदार ढिकले यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीला भाजपचा ‘शॉक’

सिद्धपिंप्री हा भाग देवळाली मतदारसंघात येतो. या मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळच यायला नको. किमान अशा वेळी आमदारांनी आंदोलनस्थळी पोचून आंदोलकांची समजूत काढणे क्रमप्राप्त ठरते. प्रत्यक्षात मात्र राज्यभर चर्चिल्या गेलेल्या या आंदोलनाची दखल घेत भाजपचे आमदार ढिकले यांनी आंदोलकांना धीर देत महावितरणलाही धारेवर धरले. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादीला एक प्रकारे शॉकच मानला जात आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेऊ नये. नाशिकच नव्हे, तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना हक्काच्या विजेसाठी अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळच यायला नको, याची ऊर्जामंत्र्यांनी काळजी घ्यायला हवी.

-ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT