CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सरकारने दिलेले ९४० रुपये शेतकरी परत करणार!

अतिवृष्टीमुळे मका पिकाचे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी ९४० रुपयांची मदत

Sampat Devgire

नामपूर : अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना (Farmers) वाढत्या महागाईच्या (Inflation) पार्श्‍वभूमीवर साडेतीन हजार कोटी रुपये मदतीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला. प्रत्यक्षात मात्र नुकसानग्रस्तांना एकरी ९४० रुपयांची मदत देऊन मायबाप सरकारने (State Government) शेतकऱ्यांच्या जखमेवर अक्षरशः मीठ चोळले आहे. (Farmers are unhappy with the financial asistance of State Government)

यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी मदत परत करण्याचा निर्णय घेतला असून, आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची भेट घेणार आहेत.

यंदा जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांत जून ते ऑगस्ट या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व्यवसायाची अपरिमित हानी झाली. राज्यभरात अनेक ठिकाणी खरीप हंगाम पूर्णत: वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘नुकसान लाखो रुपयांचे आणि भरपाई शेकड्यात’ अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचे आकडे बघून सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा आहे, याची प्रचीती येते.

खरिपातील मका, बाजरी, कापूस, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष, मोसंबी आदी फळबागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना, कृषी अभ्यासकांकडून वारंवार झाल्याने बाधित शेतकऱ्यांसाठी तीन हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता.

त्यानुसार बागलाणमध्ये गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने हेक्टरी चार हजार ७०० रुपये जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना आले आहेत. गेल्या महिन्यात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी बागलाणचा दौरा करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हेक्टरी अशी केली वाढ

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० वरून वाढवून प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपयांवरुन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रुपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे. जिरायत, बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रतिहेक्टर तीन अशी वाढ करण्यात आली आहे.

यंदा जूनच्या सुरवातीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीन, भाजीपाला आदींचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. लाखोंचे नुकसान असताना सरकार साडेचार हजार रुपये भरपाई देते, ही लाजीरवाणी बाब आहे.

- माधवराव सावंत, प्रगतिशील शेतकरी, नामपूर

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT