Tukaram Mundhe FDA action controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Mundhe FDA Vs Goras Bhandar : तुकाराम मुंढे यांच्या 'FDA'च्या कारवाईवरून वाद; 600 दूध उत्पादक शेतकरी, 5 हजार ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढा नेण्याची तयारी

FDA crackdown on dairy business controversy: अन्न व औषध प्रशासनाच्या वर्धा इथले गोरस भंडार आठ दिवसांपासून बंद पडल्याने शेतकरी-ग्राहकांनी एफडीए आयुक्तांना सामूहिक पत्र लिहून, उत्पादन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

Goras Bhandar Wardha News: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडाकेबाज कारवायांची मोहीम सुरू केली आहे.

त्यांच्या या मोहिमेला सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही पाठिंबा मिळत असून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, वर्ध्यातील गो-संवर्धन गोरस भंडारवर एफडीएने केलेल्या कारवाईनंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एफडीएच्या कारवाईमुळे गोरस भंडारचे उत्पादन आणि विक्री गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे तब्बल 600 दूध उत्पादक शेतकरी (Farmer) आणि 5 हजारांहून अधिक ग्राहक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर काही गोपालकांनी राज्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे.

गोरस भंडारचे उत्पादन तातडीने सुरू करण्यासाठी ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकरी आता थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडे दाद मागणार आहेत. यासाठी 5 हजारांहून अधिक ग्राहक आणि 600 शेतकरी सामूहिकरित्या पत्र पाठवून आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कारवाईनंतर दूध संकलन पूर्णपणे थांबल्याने त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंद झाला आहे. दररोज सुमारे 9 हजार लिटर दूध खरेदी केली जात होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून ही प्रक्रिया ठप्प असल्याने अनेक दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.

गोरस भंडारच्या बंदमुळे फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही, तर हजारो ग्राहकांनाही बसत आहे. नियमित आणि शुद्ध दूध मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. त्यामुळे या कारवाईविरोधात शुक्रवारी शेतकरी आणि ग्राहकांनी एकत्र येत मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला.

मोर्च्यानंतरही प्रश्न सुटलेला नसल्याने आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू आहे. संबंधित मागण्या थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने गोरस भंडारमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन असुरक्षित वातावरणात होत असल्याचा ठपका ठेवत संस्थेचे उत्पादन आणि विक्री पुढील आदेशापर्यंत सील केली आहे.

या कारवाईदरम्यान सुमारे 25 लाख रुपयांचा तयार माल आणि उत्पादन साठा जप्त करण्यात आला. या निर्णयानंतर दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्रीची संपूर्ण यंत्रणा बंद पडली असून त्याचे परिणाम थेट शेतकरी, वितरक, कर्मचारी आणि ग्राहकांवर होत आहेत.

वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था अर्थात गोरस भंडार ही सहकारी तत्त्वावर चालणारी गांधीवादी विचारांची संस्था म्हणून ओळखली जाते. सध्या सुमारे 85 गोपालक विविध गावांतून येथे दूध पुरवतात, तर 250 वितरक घरपोच दूध वितरणाचे काम करतात.

वर्धा शहरासह परिसरातील हजारो कुटुंबांना दूध पुरविण्यात या संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. गोरस भंडारच्या विविध केंद्रांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संस्थेचा ‘गोरस पाक’ हा दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय मानला जातो.

मात्र एफडीएच्या कारवाईनंतर संस्थेचे उत्पादन बंद झाल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ एका संस्थेपुरती मर्यादित न राहता शेतकरी, ग्राहक आणि रोजगाराशी निगडित मोठा सामाजिक-आर्थिक प्रश्न बनल्याचे चित्र वर्ध्यात दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT