IAS Tukaram Mundhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik FDA Raid : तुकाराम मुंढेंचा नाशिक विभागाला पहिला दणका; 9 हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित, अचानक टाकल्या धाडी

Tukaram Mundhe : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली FDA पथकाकडून कारवाईचा धडाका सुरु असून नाशिक विभागालाही मुंढे यांनी दणका दिला आहे. 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले.

Ganesh Sonawane

FDA Raid Nashik Division : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून सध्या राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु आहे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी संपूर्ण राज्यात 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' ही विशेष तपासणी मोहीम अत्यंत आक्रमकपणे राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक विभागात एफडीएच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे.

गेल्या दोन दिवसांत नाशिक विभागातील तब्बल २० हॉटेल्स व खाद्य आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने 9 हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार शहरातील हॉटेल्सचा यात समावेश समावेश आहे.

धक्कादायक बाब म्हणजे 4 हॉटेल चालकांकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असणारा परवानाच उपलब्ध नसल्याचे समोर आले. आवश्यक नोंदणी किंवा परवाना मिळेपर्यंत संबंधित हॉटेल चालकांना व्यवसाय बंद ठेवण्याचे लेखी निर्देश देण्यात आले आहेत.

या विशेष तपासणीदरम्यान नाशिक विभागातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांची पाहणी करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. स्वयंपाकघरात गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न याशिवाय, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचा कमालीचा अभाव दिसून आला.

तसेच आवश्यक कागदपत्रांची अनुपलब्धता, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचे तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव आढळून आला. याशिवाय अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर तपासणी केलेल्या २० पैकी एकुण ७ हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच यापूर्वी सुधारणा नोटीस देऊनही निर्धारित मुदतीत त्रुटी दूर न करणाऱ्या आणखी २ हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले. असे एकुण ९ हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाला सुट दिली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. नाशिक विभागात ही विशेष तपासणी मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांनी दिली.

परवाने निलंबित करण्यात आलेली हॉटेल्स

हॉटेल ग्रीन वॉल (जत्रा लिंक रोड, पंचवटी, नाशिक), हॉटेल राधिका (द्वारका, नाशिक), हॉटेल क्राउन पॅलेस (पेठ रोड, पंचवटी, नाशिक), हॉटेल त्रिमूर्ती (अजिंठा रोड, एमआयडीसी, जळगाव), जाधव रेस्टॉरंट (नंदुरबार), लक्ष्मी हॉटेल (सिन्नर, नाशिक), हॉटेल भानू (जळगाव), हॉटेल जय (साकेगाव शिवार, भुसावळ), गजानन कॅन्टीन (मेडिकल कॉलेज परिसर, धुळे).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT