Nashik Political News : ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे हिशेब मागण्याचा अधिकार नाही, मनोज जरांगे यांना भुजबळांनी केलेला विरोध हा आमच्या समस्त मराठा समाजाचा अवमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया देत नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी आज छगन भुजबळ यांची साथ सोडली. एवढेच नव्हे तर ज्या मनमाड बाजार समितीत आपल्या नेतृत्वाखाली पॅनेल विजयी झाले, त्यातील भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी आपल्याला सभापती म्हणून काम करू दिले नाही, असा आरोपही माजी सभापती माजी आमदार संजय पवार यांनी केला. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पवार यांनी भुजबळ यांची साथ सोडल्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. संजय पवार यांनी साथ सोडल्याने तो भुजबळांना मोठा धक्का समजला जात आहे. विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात मतदारसंघातील पाचही माजी आमदारांना एकवटण्यात छगन भुजबळ यांची खेळी अवघ्या सहा महिन्यांत मोडीत निघाली.
माजी आमदारांची ही एकजूट दीर्घकाळ टिकेल असा होरा होता. मात्र, अवघ्या सात आठ महिन्यांतच माजी आमदारांची ही एकसंधता मोडीत निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी आमदार राजाभाऊ देशमुख हे सर्वप्रथम या माजी आमदारांच्या एकत्रित छावणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानंतर आता संजय पवार यांनी भुजबळ यांची साथ सोडली. काँग्रेसचे माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांची राहुटी स्वतंत्र आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यांवर त्यांनी आतापर्यंत छगन भुजबळ यांची पाठराखण केली होती. मात्र, आता स्वतः भुजबळ हेच भाजपच्या वळचणीला गेल्याने माजी आमदार अॅड. आहेर यांना भुजबळांच्या सोबत जाता येत नाही, असे असले तरी विद्यमान आमदार सुहास कांदे याना घेरणे या मुद्द्यांवर पाचही माजी आमदारांची एकजूट दिसून आली. मात्र, ती क्षणिक ठरली आहे. तालुक्यापुरते स्थानिक राजकारणात आहेर पवार यांचे बेरजेचे राजकारण असल्याने या दोघांना सोबत घेत भुजबळांची सगळी भिस्त होती ती यानिमित्ताने मोडीत निघाली आहे.
भुजबळ यांच्या सोबत आता त्यांचे सुपुत्र माजी आमदार पंकज भुजबळ हे एकमेव माजी आमदार उरले आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेल्या गणेश धात्रक यांना लाँचिंगची संधी असल्यामुळे माजी जेष्ठ आमदार जगन्नाथ धात्रक यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत उघडपणे जाता येत नाही. माजी आमदारांची बांधण्यात आलेली एकजूट अशा रीतीने विस्कळीत झाली. याचा आयता लाभ विद्यमान आमदार सुहास कांदे हे कशा पद्धतीने घेतात? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.