Jalgaon Gram Sabha Dispute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Police : ग्रामसभेत मारहाण करणाऱ्या नेत्याची पोलिसांनी साधी चौकशीही करणे टाळले; पोलीस हतबल की राजकीय दबाव?

Jalgaon Gandhi Jayanti Gram Sabha Controversy : माजी सरपंच सुनील पाटील हे आमदार किशोर पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. यापूर्वीही त्यांनी मारहाणीचे प्रकार केल्याची चर्चा आहे. मात्र कारवाई होत नसल्याने कोणीही तक्रार करण्याचे धाडस दाखवले नव्हते.

Sampat Devgire

Jalgaon News, 04 Oct : महात्मा गांधी जयंतीला जारगाव ग्रामसभेत ग्रामस्थांच्या उपस्थितीतच सुनील पाटील या माजी सरपंचाने प्रश्न विचारणाऱ्या युवकाला मारहाण केली. मात्र याबाबत पोलिसांनी तक्रार करणाऱ्या युवकाला प्रतिसाद दिला नाही. याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्याचे पोलिसांनी टाळले.

माजी सरपंच सुनील पाटील हे आमदार किशोर पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. यापूर्वीही त्यांनी मारहाणीचे प्रकार केल्याची चर्चा आहे. मात्र कारवाई होत नसल्याने कोणीही तक्रार करण्याचे धाडस दाखवले नव्हते. जारगाव (जळगाव) येथे शिवसेनेचे माजी सरपंच आणि माजी आमदार किशोर पाटील यांचे निकटवर्तीय यांनी केलेली मारहाण राज्यभर निषेधाची बाब बनली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात मारहाण करणाऱ्या युवकाची तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी प्रचंड विलंब केला. तक्रार घेऊनही गेल्या दोन दिवसात पोलिसांनी सुनील पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त गावोगावी ग्रामसभा घेण्याची प्रथा आहे. ग्रामसभेत गावाच्या प्रश्नांविषयी चर्चा घडविली जाणे नैसर्गिक आहे. मात्र अशी चर्चा देखील शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्यांना सहन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जारगाव येथे अतुल पाटील या युवकाने गावात प्रचंड डास आणि दुर्गंधी ही समस्या असल्याचे सांगितले. प्रशासकांना गावात डास निर्मूलन औषध फवारणी का केली जात नाही? असा प्रश्न त्यांनी केला. खरे तर या प्रश्नावर प्रशासकांनी उत्तर देणे अपेक्षित होते. समाज माध्यमांवर जारगाव येथील घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. असंख्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा निषेध करीत थेट जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले.

मारहाण झालेल्या युवकाने ग्रामसभेतून जीव वाचवत थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांकडून त्याला मिळालेली वागणूक ग्रामसभेतील घटने एवढीच धक्कादायक होती. असे प्रकार घडतच असतात असे उद्दाम उत्तर पोलिसांनी दिले. दोन तास बसवून ठेवल्यानंतर दखलपात्र तक्रार घेण्यात आली. पोलिसांनी शिंदेंच्या नेत्याला अद्याप अटक किंवा चौकशीसाठी बोलाविलेले नाही.

प्रकरण चांगलेच तापल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेचे नेते पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. यामध्ये आपली काहीही चूक नसून युवकाने जाणीवपूर्वक आपल्याला डिवचण्यासाठी प्रश्न विचारल्याचा आरोप त्यांनी केला. एकंदरच या प्रकाराने "रस्सी जल गई पर बल अभी बाकी है"असाच प्रकार स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT