Deelip Khodpe & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip khodpe Politics: जामनेरची जनता यंदा मंत्री गिरीश महाजन यांचा पराभव करेल?

सामान्य कार्यकर्ता अशा प्रतिमेचे दिलीप खोडपे यांनी दिले मंत्री महाजन यांना आव्हान-Girish Mahajan Politics, BJP ex Leader Khodpe will contest against Minister Mahajan.

Sampat Devgire

Khodpe Vs Mahajan : नगर लोकसभा मतदारसंघातील बहुचर्चित विखे विरुद्ध लंके असा सामना झाला. त्याची पुनरावृत्ती भाजपचे संकट मोचक अशी प्रतिमा असलेल्या गिरीश महाजन यांच्या विरोधात होणार आहे. जामनेर मतदार संघात यंदा अतिशय चुरशीची लढत होण्याचे संकेत आहेत.

जामनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. विविध थरातून त्यांना राजकीय आव्हान दिले जात आहे. गेली सहा टर्म जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री महाजन यांच्याबाबत मतदारांमध्ये अँटी इन्कमबन्सी दिसते.

गेली 35 वर्ष भाजपचे कार्यकर्ते असलेले आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम म्हणजे महाजन यांच्या विरोधात मतदार संघात काय वातावरण आहे याची झलक म्हणता येईल.

या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री खोडपे भाषणाला उभे राहिले असता, उपस्थितांनी त्यांना जो प्रतिसाद दिला तो श्री खोडपे यांची लोकप्रियता आणि आगामी निवडणुकीत त्यांना प्रतिसाद कसा मिळेल याची चुणूक म्हणता येईल.

मंत्री महाजन यांचे कट्टर विरोधक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी महाजन यांचे सगळेच काढले. अगदी उपरोधिक स्वरात महाजन यांच्या विविध राजकीय भानगडी ही त्यांनी ओघा ओघात सांगून टाकल्या. एकंदरच या भाषणांमध्ये नेत्यांनी जामनेर मतदार संघात यंदा `लंके पॅटर्न` होणार असे संकेत दिले.

यावेळी श्री खोडपे यांनी महाजन यांनी आपल्याला फाटका कार्यकर्ता असे म्हटल्याचे सांगितले. त्यावर मी कार्यकर्त्यांशी बोललो. कार्यकर्त्यांनी तुम्ही निवडणुकीला फक्त उभे राहा. पैसे आणि मते याची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही कोणत्याही गावात आलात तरी तुम्हाला कुठेही पैसा लागणार नाही.

सर्व कार्यकर्ते आणि मतदार तुमचा प्रचार करतील असा दावा या सभेत करण्यात आला. श्री महाजन यांनी श्री खोडपे यांनी भाजप सोडल्यावर त्यांची जात आणि धर्म याविषयी विधान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या विधानामुळे मतदार संघात एक वेगळाच राजकीय संदेश जाऊ शकतो.

मंत्री महाजन यांच्या विधानाला उत्तर म्हणून श्री खोडपे यांनी मी सर्व जाती-धर्मांसाठी गेले. 35 वर्ष काम करीत आलो आहे. त्यामुळे मी जात धर्मापलीकडे मतदारांसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला झालेली गर्दी ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनाही अनपेक्षित होती. जामनेर विधानसभा मतदार संघात यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असेल. गेली तीस वर्ष ज्यांना आपण डोक्यावर घेतले. आमदार केले. ते उपकार विसरले.

उपकार विसरलेल्यांना ता जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे. ही संधी सोडू नका, असे आवाहन यातील बहुतांश नेत्यांनी केले. एकंदरच भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संकट मोचक अशी विविध प्रतिमा असलेल्या महाजन यांना यंदाची निवडणूक चुरशीची असेल, याची जाणीव करून देणारा संदेश या मेळाव्यातून मिळाला.

आगामी निवडणूक ही अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार हे नक्की. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांपेक्षाही मंत्री गिरीश महाजन विरुद्ध त्यांचे सर्व विरोधक अशी लढाई दिसून येईल. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार काय भूमिका घेतात, यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले महाजन यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT