Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर महाजन संतापले, अनेकांना दाखवणार घरचा रस्ता!

Sampat Devgire

Jalgaon BJP News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. मात्र असे असले तरी या निवडणुकीत अनेक पदाधिकारी निष्क्रिय होते.

त्यांनी निवडणुकीत विरोधकांना सर्रासपणे मदत केल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. याची गंभीर दखल भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची तयारी आता पक्षाने केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी किती सक्रिय आणि किती निष्क्रिय होते याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सविस्तर माहिती प्राप्त झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळाले. मात्र या कालावधीत अनेक पदाधिकारी पक्षात जाणीवपूर्वक निष्क्रिय राहिले. प्रचारात मनापासून सहभागी न होता विरोधकांना मदत केल्याचाही आरोप अनेक पदाधिकाऱ्यांवर आहे. या संदर्भात भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यंदा जळगावमध्ये खासदार उन्मेष महाजन यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या करण पाटील यांसह शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात प्रवेश केला. करण पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी देऊन भाजपची रसद उभी करण्यात आली होती.

भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी खासदार महाजन यांच्याशी असलेली मैत्री निभावली होती.रावेर मतदार संघात देखील रक्षा खडसे यांच्या उमेदवारी बाबत काही पदाधिकारी नाराज होते.

त्यांनी मनापासून काम केले नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांना पर्यायी यंत्रणा उभी करावी लागली. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावला येऊन झाडाझडती घेतली होती.

ग्रामविकास मंत्री महाजन यांनी याबाबत थेट नाराजी व्यक्त केली. अनेक पदाधिकारी निष्क्रिय होते. अनेकांनी मनापासून काम केले नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार विजयी झाले असले तरी, मताधिक्य कमी झाल्याची कारणे शोधली जातील.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचे ऑपरेशन करून खांदेपालट करण्यात येईल, असे संकेत महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT