Jalgaon Nagarsevak sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला धक्का, १३ नगरसेवक स्वगृही

गेल्या चार महिन्यापूर्वी महापौर निवडणुकीवेळी भाजपचे तब्बल २९ नगरसेवक फुटले होते. त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. त्यामुळे जळगावात सत्तांतर होऊन शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता.

सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षातून फुटून गेलेल्या २९ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. मात्र, त्यातील १३ नगरसेवकांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला असून भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी पुन्हा शिवसेनेला धक्का दिला आहे.

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, गेल्या चार महिन्यापूर्वी महापौर निवडणुकीवेळी भाजपचे तब्बल २९ नगरसेवक फुटले होते. त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. त्यामुळे जळगावात सत्तांतर होऊन शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता. तर बंडखोर भाजप गटाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने फुटलेल्या नगरसेवकांना बडतर्फे करावे यासाठी विभागीय आयुक्ताकडे याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे.

याच दरम्यान, फुटलेल्या नगरसेवकांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी प्रयत्न सुरू केले होते. महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडून माहिती अधिकारात माहिती मागवून सद्य स्थितीत महापालिकेचा गटनेता कोण आहे, याची माहिती मागविली. यात भाजपचे गटनेते भगत बालाणी हेच गटनेते असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. त्याचा दावाही भाजपने महापालिकेत आयुक्त व महापौराकडे केला आहे. यामुळे फुटीर गटातील नगरसेवकांत अपात्र होण्याची भिती निर्माण झाली आहे, त्यामुळे आपल्यावर कारवाई होवू नये यासाठी काही फुटीर गटातील नगरसेवक आता पुन्हा भारतीय जनता परतत आहेत.

१३ नगरसेवक स्वगृही

भारतीय जनता पक्षातून फुटलेल्या २९ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक आज पुन्हा भारतीय जनता पक्षात स्वगृही परतले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांना यांच्या जळगाव येथील जी.एम.फाउंडेशन या संपर्क कार्यालयात या नगरसेवकांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजप गटनेते भगत बालाणी, जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी,अरविंद देशमुख , नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, आदी उपस्थित होते. स्वगृही आलेल्या नगरसेवकांमध्ये रंजना भरत सपकाळे, मीना धुडकू सपकाळे, कांचन सोनवणे, प्रतिभा पाटील, प्रवीण कोल्हे, रूखसाना बी बबलूखान, शोभा बारी, सुरेश सोनवणे, हसीना बी शेख, दत्तु कोळी, पार्वताबाई भील, प्रिया जोहरे, मिनाक्षी पाटील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT