girish mahajan sanjay raut sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

BJP Political News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी रसद पुरवली आहे, आणि मोदी शहा सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sachin Waghmare

Jalgaon News : शिवसेना नेते संजय राऊत यांचे डोकं तपासावे लागेल. आता तेवढेच राहिले आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी रसद पुरवली आहे, आणि मोदी शहा सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्हा उष्माघातावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा आवश्यक काम नसताना बाहेर पडू नये. जिल्ह्यात बेवारस नागिरिकांचे मृतदेह आढळले आहेत. त्यात काही जणांचा उष्माघातामुळेच मृत्यू झालेला असेल, कारण 47 पर्यंत तापमान पोहोचलेले आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम होत आहे. (Girish Mahajan Vs Sanjay Raut News)

लोकसभा निकालाबाबत बोलताना महाजन म्हणाले, घोडामैदान समोर आहे. काय आहे ते समोर येईल. जळगाव लोकसभेच्या जागेबाबत बातम्या, निराधार गोष्टी आहेत. त्यामुळे आपण चार तारखेला भेटू. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभाममध्ये आमच्या उमेदवाराला सर्वात जास्त उच्चांकी विक्रमी मत राहतील. लिहून घ्या उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या (Mahayuti) सहाच्या सहा जागा महायुती जिंकेल, असेही महाजन म्हणाले.

राज्यामध्ये सर्वात जास्त निकाल हा महायुतीच्या जागेबाबत महाराष्ट्रातून जाईल. देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) होणार आहेत. स्पष्ट बहुमत आमचं देशामध्ये येईल. मोठ्या मतांनी आमचे खासदार देशात निवडून येतील व पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. पूर्ण देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं ठरवले आहे. त्यानुसार तेच पंतप्रधान होतील, असा दावा महाजन यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामदेववाडी अपघात मयत कुटुंबाला मदत करणार

ज्या दिवशी अपघात झाला. त्या दिवशी मी रात्रभर जिल्हा रुग्णालयात होतो. माझे सर्व आमदार पदाधिकारी कार्यकर्ते हे रुग्णालयात होते. सकाळी मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा होते. त्यामुळे मंत्र्यांनी दखल घेतली नाही, अशा कुठलाही विषय नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो.

आम्ही उद्या मयत कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचा धनादेश देत आहोत, असेही महाजन म्हणाले. या प्रकरणात कोणाचाही राजकीय दबाव नाही. यात जो कोणी असेल त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT