Gram Panchayat Elections Result 2023
Gram Panchayat Elections Result 2023  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election 2023: सरपंच कोणाचा? दावे-प्रतिदाव्यांनी राजकारण पेटले...

Mangesh Mahale

महेश माळवे

Shrirampur : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा खाली बसला. असे असले तरी गुलाल कोणाचा हा प्रश्न आता निवडणुकीत दिवसरात्र झटणाऱ्या या कार्य़कर्त्यांसह मतदार व सर्वांनाच पडू लागला आहे. गावपातळीवर लढली गेलेल्या या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी सरपंच आपलाच असे दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. निवडणुकीत करण्यात आलेली युती-आघाडी याला कारणीभूत ठरत आहे.

तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींपैकी ४ बिनविरोध करण्यात आल्या. यासाठी स्थानिक पातळीवर झालेले समझोत्यात सर्वच पक्षाच्या सदस्यांना सोबत घेण्यात आले. भैरवनाथनगरला महादेवाच्या मंदिराच्या जीर्णाद्धारासाठी निवडणूक बिनविरोध झाली. येथील सरपंचपदावर मुरकुटे, ससाणे व कानडे सर्वच गटाने दावा केला. शेवटी उमेदवारालाच निर्णय घ्यावा लागणार आहे.

जाफराबादलाही विखे समर्थक शारदा शेलार यांची लागलेली वर्णीही समझोत्याचीच होती. उर्वरित १३ ग्रामपंचायतीत कानडे-ससाणे-विखे विरुद्ध मुरकुटे, मुरकुटे-ससाणे-विखे विरुद्ध विखे-आदिक-कानडे, मुरकुटे-विखे विरुद्ध ससाणे-शेतकरी संघटना, मुरकुटे-विखे-ससाणे विरुद्ध कानडे-शेजुळ, विखे-ससाणे-कानडे विरुद्ध मुरकुटे-ससाणे अशा प्रमुख युती, आघाडीत निवडणुका लढविल्या गेल्या. त्यामुळे निवडणुक काळात काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना केवळ आपल्या समोरील विरोध कोण हाच पर्याय होता. मात्र, आता निवडणुकीनंतर सरपंच व सदस्य सर्वाधिक आमचेच असे दावे-प्रतिदावे सुरू झाल्याने सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वाधिक जागा आपल्याच असा संदेश नेत्यांपर्यंत देत गुलाल घेतला.

श्रीरामपूर तालुक्यातील १३ पैकी सहा, तर राहुरी तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीत मिळून आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी ९, तर सदस्यपदी ५४ उमेदवारांनी बाजी मारली. नाऊर, भोकर, कान्हेगाव, माळवाडगाव, दत्तनगर, खिर्डी सरपंचपदासह काही सदस्य विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे व सहकाऱ्यांनी १७ पैकी १० सरपंच भाजप व युतीचे विजयी केल्याचा दावा केला आहे. यामध्ये रामपूर व जाफराबाद बिनविरोध, शिरसगाव, कडित, नाऊर, कान्हेगाव, फत्याबाद संपूर्ण भाजपसह विखे गटाचे, तर भोकर, निमगाव खैरी, उंदिरगाव युतीमध्ये विजयी सरपंचांनी भाजपचा झेंडा रोवला असल्याचे म्हटले आहे.

मुरकुटे गटाचेही सहा ठिकाणी सरपंच विजयी झाले आहेत. करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायतीत सदस्यांसह सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दत्तनगरला महसूलमंत्री विखे यांनी माजी सभापती नानासाहेब शिंदे यांना ताकद दिली होती. मात्र, (कै.) जयंत ससाणे यांचा बालेकिल्ला असलेली ही ग्रामपंचायत आपल्याकडे ठेवण्यात यश आल्याचे ससाणे यांनी म्हटले आहे. हे दावे-प्रतिदावे यापुढील काळातही सुरू राहतील. मात्र, गुलाल कोणाचा असला तरी विकास कामे करताना सर्वांनाच सोबत घेण्याचे कसब नवीन कारभाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT