Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results : संगमनेर ग्रामपंचायत निवडणुकीत 'बाळासाहेब थोरात, लय जोरात...'

Nagar Gram Panchayat Election : संगमनेर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर आमदार थोरात गटाचे वर्चस्व

Pradeep Pendhare

Balasaheb Thorat News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार थोरात गटाचा दबदबा दिसला आहे.

संगमनेर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर आमदार थोरात, तर प्रत्येकी एकावर विखे आणि शिवसेनेच्या उठाबा गटाने विजयी मिळवला. संगमनेर तालुक्यात आमदार थोरात गटाने वर्चस्व मिळवल्याने त्याचा आनंदोत्सव यशोधन परिसरात साजरा करण्यात आला. 'बाळासाहेब लय जोरात जोरात', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संगमनेरमधील यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे ग्रामपंचायत निवडणुकींमधील विजयी उमेदवारांचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड.माधवराव कानवडे ,रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, संतोष हासे, बादशहा वाळुंज, विजय हिंगे, संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ढोलेवाडी व बोरबन या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ढोलेवाडीच्या सरपंचपदी शालिनी बाळासाहेब ढोले, तर बोरवनच्या सरपंचपदी अरुणा बाळासाहेब गाडेकर यांची निवड झाली आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी अमोल उर्फ नरेंद्र संभाजी गुंजाळ यांची मोठ्या मताधिक्याने विजय झाला. येथे 17 पैकी 17 जागेवर काँग्रेस गटाचे उमेदवार विजयी झाले.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये आमदार थोरात गटाने दहा जागांवर बाजी मारत विखे गटाचे पानिपत केले. सरपंचपदी आमदार थोरात गटाचे पाणी वाटपासाठी असलेले ग्रामपंचायत कर्मचारी पाणीवाले बाबा ऊर्फ नामदेव किसन शिंदे हे विजयी झाले. पिंपळगाव कोझिरा ग्रामपंचायतमध्ये सर्व नऊ सदस्य काँग्रेस पक्षाचे विजयी झाले असून सरपंचपदी सोनाली संदीप करपे या विजयी झाल्या आहेत.

घारगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांचे बंधू नितीन आहेर हे सरपंचपदी निवडून आले आहे. नितीन आहेर हे विखे गटाकडून आहेत. ग्रामपंचायतीत विखे गटाचे सर्वच्या सर्व जागा आहेर यांनी निवडून आणल्या आहेत. अश्वी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये विखे-थोरात यांच्यात चांगलीच लढत आहे. आश्वी खुर्दची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून येथे विखे यांची एकतंबू सत्ता होती. यावेळी देखील चुरशीच्या लढतीत काॅंग्रेसच्या थोरात गटाने येथे खिंडार पाडले.

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या 11 जागांपैकी एक जागा थोरात गटाकडे केली आहे. येथे सरपंचपदी विखे गटाचे बापूसाहेब गायकवाड निवडून आले आहेत. आश्वी बुद्रुकमध्ये थोरात गटाने वर्चस्व मिळवले. 17 जागांपैकी 11 जागांवर थोरात गटाने, तर पाच जागांवर विखे गटाने विजय मिळवला. थोरात गटाने सरपंचपद राखले असून, नामदेव शिंदे सरपंचपदी विजयी झाले आहे.

संगमनेर तालुक्यात आमदार थोरात गटाने ग्रामपंचयातीत यश मिळवल्यानंतर यशोधन या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळण्यात आला. फटक्यांची आतिषबाजी झाली. बाळासाहेब थोरात लय जोरात... लय जोरात... अशा घोषणाबाजींनी परिसर दुमदुमला होता.

दहशतीचा एकत्रपणे मुकाबला केल्याने विजय - बाळासाहेब थोरात

ग्रामपंचायतीमध्ये विजयी उमेदवारांचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्र व राज्यातील सरकार विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी असून आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर येईल. संगमनेर तालुक्यात कायम सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जात आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या एकीचा व विकासकामांचा आहे. या निवडणुकीत बाह्य शक्तींनी मोठ्या दबावाचा व इतर गोष्टींचा खूप वापर केला. मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही. संगमनेर तालुक्यातील जनतेला त्यांची दहशत मान्य नाही.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्येही कार्यकर्त्यांनी जिकरीने लढा दिला. तेथे मोठ्या दबाव तंत्राचा वापर झाला. खूप ताकद लावली गेली. मात्र जनतेने दडपशाही झुगारली. राहाता तालुक्यामध्ये ही काँग्रेस पक्षाच्या विचाराला मोठे यश मिळाले आहे. यापुढेही सर्वांनी गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहावे, असे सांगताना राज्यातील व केंद्रातील सरकारवर जनतेची पूर्ण नाराजी आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अमली पदार्थांची तस्करी, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारचे शेतकरी व सर्वसामान्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

यामुळे जनतेमध्ये मोठा रोष असून राज्यात सर्वत्र काँग्रेसची हवा आहे. आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT