Dharti Devre & Sangram Patil
Dharti Devre & Sangram Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षाची कन्या धरती देवरे पहिल्याच निवडणुकीत डायरेक्ट सभापती!

Sampat Devgire

धुळे : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे ही दोन आठवड्यांपूर्वी राजकारणात आल्या. जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्या, आणि काल थेट जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापति विराजमान झाल्या. ग्रामीण राजकारणात अनेक वर्षे प्रतिक्षा करूनही अनेकांना जे साध्य होत नाही, ते राजकीय गॅाडफादर असल्यावर राजकारणात कशी `झटपट` गोळी मिळते याचे हे उदाहरण आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतिपदी धरती निखिल देवरे, तर कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी संग्राम पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

नंदुरबार जिल्हा परिषदेत नुकतीच उपाध्यक्ष, दोन सभापती निवडीत भाजपने तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे सदस्य बिनविरोध निवडून आले. याच फार्म्युल्याची आठवण भाजपच्या येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे करून दिल्यानंतर आघाडीने माघार घेतली आणि सौ. देवरे, श्री. पाटील बिनविरोध निवडून आले. जिल्हा परिषदेत ही निवडप्रक्रिया झाली. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे पीठासीन अधिकारी होत्या. त्यांना तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी सहाय्य केले.

सभापतिपदासाठी भाजपतर्फे सौ. देवरे, श्री. पाटील यांनी अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीतर्फे महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी अनिता गणपत चौरे, तर कृषी सभापतीसाठी आनंदा दत्तात्रय पाटील यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषदेत भाजपची बहुमताने सत्ता आहे. त्यामुळे सौ. देवरे व श्री. पाटील यांची निवड निश्‍चित होती; परंतु आघाडीतर्फे प्रतिस्पर्धी रिंगणात आल्याने निवडप्रक्रिया सुरू झाली. दुपारी तीनला आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यावर सौ. देवरे, श्री. पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यांना नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे.

सौ. देवरे यांची महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी निवड निश्‍चित होती. मात्र, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदासाठी शिरूड गटातील भाजपचे सदस्य आशुतोष पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांची अडीच वर्षे पूर्ण कार्यकाळ मिळावा, अशी आग्रही मागणी होती. त्यामुळे कुसुंबा गटातील सदस्य संग्राम पाटील यांचे नाव पुढे आले. त्यांनी सभापती होण्यास नकार दिला. मात्र, त्यांची भाजपच्या काही नेत्यांनी मनधरणी केली. त्यात ते यशस्वी झाले. कायदेशीर लढाईत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून १५ सदस्य अपात्र ठरले. त्यात कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण सभापतिपदाचाही समावेश होता. त्यामुळे १५ जागांच्या निवडणुकीनंतर सभापती निवड झाली. तत्पूर्वी, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नेते सुभाष देवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, कामराज निकम व अन्य सदस्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात सौ. देवरे, श्री. पाटील यांची नावे निश्‍चित झाली होती.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT