Gulabrao Patil & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil Politics: अजित पवारांना घरचा आहेर, मंत्र्याचा संताप, म्हणाले, हे तर सर्वात नालायक...

Gulabrao Patil politics, Gulabrao Patil got angry on Finance Department of Deputy Chief Minister Ajit Pawar-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर आपला संताप व्यक्त केला

Sampat Devgire

Gulabrao Patil News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सर्वकाही आलबेल नाही. याची अधुन मधून येतच असते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांत देखील नेत्यांना चिमटे काढण्याचे प्रकार सुरूच असतात. मात्र गेले काही दिवस शिंदे गटातील आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याबाबत नाराजी व्यक्त होत असते. आज मात्र त्याचा भडकाच उडाला.

महायुती सरकारच्या मंत्री आणि आमदारांमध्ये विविध विकास कामांच्या मंजुरीसाठी स्पर्धा असते. प्रत्येक आमदारासाठी रोज नव्या घोषणा होत असतात. मात्र या घोषणा होताना त्यासाठीची आर्थिक तरतूद आणि अन्य विषयावर ओढातान होतच असते. त्याची प्रचिती आज जळगावच्या कार्यक्रमात आली.

राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या एका प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पाठविलेली फाईल अर्थ खात्याने कशी अडवली, याची माहितीच दिली. यावेळी त्यांनी या खात्याच्या कारभाराबाबत शेलक्या शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले.

मंत्री पाटील म्हणाले, एका प्रकल्पाची फाईल या अर्थ खात्याने दहा वेळा परत पाठवली. आम्ही देखील सतत पाठपुरावा करीत राहिलो. हा विभाग अत्यंत नालायक आहे. प्रत्येकाचे काम आडविण्यात त्याचा हातखंडा आहे.

यावेळी संतापलेल्या मंत्री पाटील यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ते म्हणाले, पाणीपुरवठा खात्याच्या मंजुरीसाठी पाठवलेली फाईल दहा वेळा परत आली. मात्र मी देखील तेवढाच जागरूक आहे.

मी देखील पाठपुरावा करण्याचे सोडला नाही. आम्ही देखील ती फाईल दहा वेळा पुन्हा मंजुरीसाठी पाठविली. या खात्याच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी असतात. अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे, अशी शेरेबाजी त्यांनी केली. अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच हा टोला होता.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सार्वजनिक कार्यक्रमातच आपल्या संतापाला वाट करून दिली. जळगाव येथे हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्री पाटील यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे विविध अधिकारी देखील उपस्थित होते.

या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे विविध अडचणी मांडल्या त्याला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनात काम करताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. विशेषतः अर्थ खात्याच्या तऱ्हेवाईकपणाबद्दल त्यांनी आपली नाराजी उघड केली.

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या मंत्र्याने उपमुख्यमंत्री पवार यांच्या खात्याविषयी थेट गंभीर आक्षेप नोंदवला. अर्थ खात्याच्या कामकाजाविषयी यापूर्वी देखील सहकारी पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. मंत्री पाटील यांच्या आजच्या विधानामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या कामकाजाविषयी थेट नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री, आमदार आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्यात नाराजी नाट्य तर सुरू नाही ना? अशी चर्चा होऊ लागली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT