Nandurbar ZP News: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दिलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर येण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संघर्षाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीतील गटबाजीची पुनरावृत्ती होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भातील निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. भाजपचे एकहाती नेतृत्व आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे भाजपचे अन्य नेते सातत्याने अडगळीला पडले. हे वर्चस्व यंदाच्या निवडणुकीत टिकणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
गावित कुटुंबीयांच्या वर्चस्वापुढे भाजपच्या अन्य नेत्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे सांगितले जाते. पालकमंत्री, लोकसभा विधानसभा आणि जिल्हा परिषद या सर्वच संस्थांवर गावित यांनी आपली एकहाती पकड मजबूत ठेवली. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत गटबाजीमुळे गावित यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर हिना गावित यांनी पुन्हा एकदा भाजप अर्थात गावित कुटुंब स्वबळावर जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी एकाच दगडात भाजपचे पक्षांतर्गत विरोधक आणि महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला संदेश देत दोन पक्षी मारले आहे. त्यातून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे.
यापूर्वी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यांच्या कन्या सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले, तर दुसऱ्या कन्या डॉ. हिना गावित खासदार होत्या. त्यांचे बंधूही आमदार आहेत. त्यामुळे सत्ताकेंद्रांवर गावित कुटुंबाचे वर्चस्व राहिल्याने महायुतीचे सहकारी पक्ष एवढेच नव्हे तर भाजप पक्षातील अन्य नेत्यांनाही दुय्यम स्थान होते. त्यातून नंदुरबार मध्ये महायुतीत असंतोष असल्याची चर्चा आहे.
नंदुरबारमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्येही दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष दिसून आला होता .लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसल्याने काँग्रेसकडून भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला. माजी खासदार हिना गावित यांनी त्याचीच परतफेड करण्याचा चंग बांधला आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील फुटीचा काँग्रेस किती फायदा घेऊ शकेल हा देखील चर्चेचा विषय आहे. आमदार शिरीष नाईक आहेत. शिवसेनेचे आमश्या पाडवी हे रघुवंशी यांच्या सोबत आहेत. डॉ विजयकुमार गावित आणि राजेश पाडवी हे दोघे भाजपचे आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांना बाजूला सारत हिना गावित यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावित विरुद्ध अन्य सर्व असा सामना जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.