Ahilyanagar DCC Bank News: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी फेटाळली.निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवताना, निवडणूक प्रक्रियेच्या या टप्प्यावर न्यायालयीन हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मात्र, निवडणुकीनंतर कायद्यानुसार योग्य ती दाद मागण्याचे स्वातंत्र्य याचिकाकर्त्याला असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-२०३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीत राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सहकारी संस्थांच्या गटातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती.
संबंधित सहकारी साखर कारखान्याचे कर्ज थकीत असून, कारखान्याचे तज्ज्ञ संचालक असलेल्या डॉ. विखे पाटील यांनी हमीपत्र दिले असल्याने ते महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील तरतुदींनुसार अपात्र ठरतात, असा याचिकाकर्त्याचा दावा होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ६ ऑक्टोबरला ही हरकत फेटाळून उमेदवारी अर्ज वैध ठरविला. त्याविरोधात घोगरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रतेक्ष तलवार आणि ॲड. ऋषभ तलवार यांनी बाजू मांडली. तर डॉ. विखे पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. व्ही.डी. होन आणि ॲड. ए.डी. ओस्तवाल यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना या टप्प्यावर न्यायालयाने हस्तक्षेप करणे उचित नसल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.