Hiraman Khoskar & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar Politics: आमदार खोसकरांवर काँग्रेसची फुली, खोसकर जाणार अजित पवारांच्या पक्षात!

Congress MLA Khoskar may join NCP Ajit Pawar Group : काँग्रेस आमदार खोसकर यांना क्रॉस व्होटींग चांगलीच भोवली असून पक्षाने त्यांची राजकीय कोंडी केली आहे.

Sampat Devgire

Hiraman Khoskar News: क्रॉस व्होटिंग मुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा बातम्या झळकले आहेत. त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वेगळीच माहिती पुढे आली आहे.

काँग्रेस आमदार खोसकर यांच्यावर क्रॉस व्होटिंग केल्याने कारवाई होणार आहे. पक्ष श्रेष्ठींनी तसे संकेत दिले आहेत. याबाबतचा निर्णय आधीच झालेला आहे. त्यामुळे आमदार खोसकर यांचे राजकीय भवितव्य सध्या अधांतरी आहे.

आमदार खोसकर यांना कुठल्यातरी पक्षाचा आधार हवाच आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा आहेत.

प्रत्यक्षात मात्र आमदार खोसकर नाशिक येथे सुरू असलेल्या आदिवासी आंदोलनासंदर्भात त्यांची भेट घेतती आहे, असे सुत्रांनी सांगितले. मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती. मात्र पटोले यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही.

आमदार खोसकर प्रदीर्घ काळापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. क्रॉस व्होटिंग देखील त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सांगण्यावरूनच केले, असे बोलले जाते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या लाभात केलेल्या क्रॉस वोटिंगचा त्यांना भरपूर लाभही झाला आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये राज्यभरातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या विविध विकास कामांचा समावेश होता. त्यात अगदी भाजपच्या मंत्री आणि मोठ्या नेत्यांनाही किरकोळ निधी देऊन मार्गी लावण्यात आले होते. मात्र विरोधी काँग्रेस पक्षात असूनही आमदार खोसकर यांना सुमारे २८५ कोटींचा निधी मिळाला.

राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याने काँग्रेसच्या सात आमदारांवर पक्षाच्या नेत्यांची वक्रदृष्टी झाली आहे. दुसऱ्यांदा क्रॉस वोटिंग झाल्याने काँग्रेस पक्षाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाले आहे.

याबाबत राज्यातील नेत्यांनी पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने त्यांच्यावर कारवाईची शिफारस करणारे पत्र हायकमांडला देण्यात आले. त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या सर्व आमदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

त्याबाबत राज्यातील नेत्यांना कळविण्यात आले आहे. या पाचही आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही. त्यांच्या जागी नव्या उमेदवाराचा शोध सुरू करण्यात आला आहे.

क्रॉस व्होटिंग प्रकरण आमदार खोसकर यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. मतदारसंघातही त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. या स्थितीत राजकीय अस्तित्वासाठी सध्या त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचे त्यांचे जवळपास निश्चित झाले आहे.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असल्याचे कळते. या संदर्भात महायुतीतील ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे मतदारसंघाची अदलाबदल केली जाईल असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT