Sharad Pawar Yeola Meeting : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Yeola Meeting : भूजबळांच्या बालेकिल्ल्यात पवारांच्या साथील जुना शिलेदार सरसावला; तर शिवसेनेचे दराडेही रिंगणात

Chagan Bhujbal Yeola Politics: या सभेसाठी शरद पवार यांनी येवल्यातील एका महत्त्वाच्या जागेची निवड केली आहे.

संतोष विंचू ः सरकारनामा ब्युरो

Yeola NCP Political Crisis: अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने राज्याच्या राजकारणाला एकच वेगळच वळण मिळालं आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आले आहे. यानंतर आज शरद पवार यांची भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज (८ जुलै) दुपारी तीन वाजता पहिली सभा होणार आहे.

विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी सभेची जोरदार तयारी केली. पण यासोबतच त्यांनी इतर नेत्यांचीही सांगड घातली आहे. शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी माजी आमदार मारोतराव पवार, शिवसेनेचे (ठाकरे)आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे देखील या सभेसाठी पुढाकार घेतला आहे.या पार्श्वभूमीवर येथील राजकीय पटलावरही नवी समीकरणे थोरल्या पवारांच्या या सभेतून निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या सभेसाठी शरद पवार यांनी येवल्यातील एका महत्त्वाच्या जागेची निवड केली आहे. 2004 मध्ये येवल्यासाठी अगदी नवख्या असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी ज्या बाजार समितीच्या सभामंडपात आग्रह सभा झाली होती, त्याच सभागृहात आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या पुढाकारातून शरद पवार यांची सभा होणार आहे.

2004 मध्ये भुजबळांना येथून उमेदवारी द्या, असा हट्ट धरत शिंदेंनी थेट पवार साहेबांपुढे घोषणाबाजी केली होती,आज हेच समीकरण पूर्णतः विरोधाभासाचे झाले आहे.2019 च्या निवडणुकीत भुजबळांच्या विरोधात प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश चिटणीस असलेल्या शिंदे यांना थेट पक्षातून निलंबित केले होते गेले.

तीन वर्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या शिंदे यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. किंबहुना सिल्वर ओक'ला जाऊन भेट घेत येवल्यात पहिली सभा घेण्याचा आग्रह केला होता. अखेर आज या ठिकाणी शरद पवार यांची मोठी सभा होणार आहे.या मतदारसंघात आजही शरद पवारांचे वलय असल्याने ही सभा भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल का, याकडेही आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मारोतराव पवारही रिंगणात!

दुसरीकडे शरद पवार यांचे पुलोद सरकारमधील एकेकाळचे सहकारी आणि माजी आमदार मारोतराव पवार हेदेखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. पुलोद सरकार स्थापन झाल्यापासून बारामतीशी त्यांचे मारोतरावांचे स्नेहाचे नाते आहे. मध्यंतरी उमेदवारीसाठी पवार कुटुंबियाना शिवसेनेचा रस्ता धरावा लागला असला तरी शरद पवार यांच्याशी त्यांचे स्नेहाचे नाते संपलेले नाही.याच नात्याला वृद्धिंगत करत स्वतः मारोतराव पवार आजच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. आज त्यांनीही सभास्थळी उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतला. तसेच सोशल मीडियातून आवाहन करत समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.यामुळे आजच्या सभेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेना उतरली रिंगणात!

इतकेच नव्हे तर, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेसोबत राहणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे. आजच्या शरद पवार यांच्या सभेला शिवसेनेने उपस्थित रहावे, अशा सूचनाही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याकडून आज करण्यात आल्या.त्यामुळे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे,जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह शिवसेना या सभेत ताकतीने सहभागी होणार आहे. किंबहुना सभेच्या नियोजनातही शिवसेनेचे सहकार्य व योगदान मिळाले आहे. शिवसेनेसह काँग्रेसचाही सहभाग राहणार असल्याने आजची सभा राजकीय दृष्टया वेगळीच ठरेल हे नक्की!!

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT