बोदवड : मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास जमील बागवान उर्फ बाबा (Jamil Bagwan) यास पोलिस ठाण्यात बोलावून ‘वाळूच्या चार हप्त्यांची रक्कम तुझी किडनी विकून मला दे’ (Sell your kidney give & give me instalment for sand trading) असे म्हणत पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड (Police inspector Rahul Gaikwad) यांनी नगराध्यक्षांच्या पती देखत जमील बागवान यास मारहाण केली, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी केला.
आमदार पाटील यांनी बोदवड पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत, हे पोलिस ठाणे राजकीय अड्डा बनले आहे, असा गंभीर आरोप शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात ते म्हणाले, ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ या पोलिस प्रशासनाच्या ब्रीदवाक्याला बोदवड पोलिस ठाणे पात्र ठरत नसून एका विशिष्ट पक्षाचा राजकीय अड्डा हे पोलिस ठाणे बनले आहे. येथील पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड एखाद्या पक्षाचे राजकीय पक्षाचे असल्यासारखे वागत आहेत.
यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, मंगळवारी रात्रीपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पोलिस निरीक्षक यांच्या मनमानी कारभाराविरोधात नगराध्यक्षांचे पती सईद बागवान यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून आमदार पाटील यांनी दिनांक बुधवारी बोदवड विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली.
संबंधित पोलिस निरीक्षकांबाबत बोलताना ते म्हणाले, की पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड हे पदाचा दुरुपयोग करत आहेत. भाजी विक्रेते तसेच तक्रार देणाऱ्या सर्वसामान्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. नुकतीच त्यांनी एका पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना काहीएक कारण नसताना गाडीच्या काचा फोडत पत्नीसमोर भरचौकात मारले. यासह तक्रार देण्यासाठी येवती येथील मुकेश महाजन हे जखमी असताना त्यांना मारहाण केली. अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांचे अर्वाच्च भाषेत बोलत त्यांना दम देण्याचा प्रकार गायकवाड करीत आहेत. ते एका विशिष्ट पक्षाच्या सांगण्यावरून राजकीय पदाधिकारी कार्याप्रमाणे वागत आहेत. गायकवाड यांच्या मनमानी कारभाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्यापही कारवाई होत नसल्याने या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, वेळ पडल्यास सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानाही मी आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
याच वेळी जमील बागवान याने त्याला वाळू हप्त्यावरून गलिच्छ भाषेत संभाषण करून मारहाण केली असल्याचे सांगितले तर नगराध्यक्षांचे पती सईद बागवान यांनीही गायकवाड यांच्यावर आरोप- प्रत्यारोप केले. याच वेळी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष यांनी पोलिस निरीक्षक गायकवाड यांचा पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी निषेध केला व कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी नगरसेवक सुनील बोरसे, देवा खेवलकर, आनंदा पाटील, सलिम कुरेशी, तालुकाप्रमुख गजानन खोडके, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शाताराम कोळी, गोपाल पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बाबत पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, म्हसोबा मंदिर परिसरातील चौकात जमील बागवान आणि अज्ञात युवकांची हमरीतुमरी झाली होती. त्या संबंधी चौकशीसाठी जमील बागवान यांना बोलविण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
...
माझ्यावर होत असलेले आरोप शंभर टक्के खोटे आहेत. राजकीय हेतूने माझ्या विरोधात अनेकांनी खोट्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या आहेत. निवडणूक जवळ येत असल्यामुळे ठरवून आरोप करण्यात येत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठल्याही मारहाणीचा प्रकार नसून पोलिस प्रशासनाची नाहक बदनामी सुरू असून, माझ्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत.
- राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक, बोदवड .
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.