Nashik News : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचे चटके आता नाशिकलाही बसत आहेत. यासंदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि कृषी निर्यातीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत चिंता व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
इराण व इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदरावर शेतमालाचे हजार ते दीड हजार दुबईच्या दिशेने जाणारे कंटेनर अडकले आहेत. ज्यात तब्बल दीडशे ते दोनशेहुन अधिक कंटेनर एकट्या नाशिक जिल्ह्यातून निर्यात होणारे कांदा, द्राक्ष, पपई आदी नाशवंत शेतमालाचे आहेत. हा माल वेळेत पोहचला नाही तर खराब होण्याची भीती असून त्यातून शेतकरी व निर्यातदार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
खासदार वाजे यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच लोकसभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीला ई-मेल तसेच पत्राद्वारे सविस्तर निवेदन पाठवले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही स्वतंत्र पत्र लिहून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
द्राक्षे, कांदा, डाळिंब, पपई, मनुका यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिक जिल्हा देशातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. दर महिन्याला हजारो टन नाशवंत शेतमाल आखाती देशांकडे निर्यात होतो. मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे समुद्री मार्गांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे मोठ्या प्रमाणात कृषी माल अडकून पडल्याची माहिती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामुळे शेतकरी व निर्यातदारांमध्ये अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याचे खासदार वाजेंनी म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वपूर्ण उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यामध्ये आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर सातत्याने लक्ष ठेवणे, आवश्यकतेनुसार तातडीच्या सूचना व हेल्पलाईन सुरू करणे, परिस्थिती बिघडल्यास नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची पूर्वतयारी ठेवणे तसेच कृषी निर्यात सुरळीत राहावी यासाठी शिपिंग व बंदर प्राधिकरणांशी समन्वय साधून शेतकरी व निर्यातदारांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबविणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनानेही केंद्र सरकारशी समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.