Sunil Mahajan, Jalgaon
Sunil Mahajan, Jalgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सत्तेत असताना भाजप नेत्यांनी झोपा काढल्या का?

Sampat Devgire

जळगाव : महापालिकेत (Jalgaon) भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत होता, त्या अडीच वर्षांत पदाधिकारी, नगरसेवकांनी झोपा काढल्या का? त्याच वेळी या प्रक्रियेला त्यांनी विरोध का केला नाही, असा सवाल महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन (Sunil Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत केला.

घरपट्टीत वाढ केलेली नाही. मालमत्तेत बदल केला असल्यास त्यावर आकारणी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने घरपट्टी वाढीव आकारणीविरोधात मोर्चा काढला. त्यावर विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले, की शहरातील मालमत्तांच्या फेर आकारणीचा प्रस्ताव आला होता. त्या वेळी आम्ही त्याचा विरोध केला होता. आजही प्रशासनाकडून कर आकारणीत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, २००२ पासून महापालिकेकडून फेरमूल्यांकन न केल्याने २०१६ मध्ये फेरमूल्यांकनासंदर्भांत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सर्व्हे करून नवीन मालमत्तांचा शोध घेण्यात आला. पूर्वीच्या मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे व वापरात बदल झाल्यामुळे त्यांना वाढीव किंवा बदल झालेल्या वापराची बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे त्याला घरपट्टीत वाढ म्हणता येणार नाही.

भाजपवरच आरोप करीत सुनील महाजन म्हणाले, की २०१९-२० मध्ये अर्थसंकल्पीय सभेत भाजपच्या तत्कालीन सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, फक्त सुनावणी बाकी आहे. ही सुनावणी घेऊन अंमलबजावणी झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात २७ कोटींची वाढ होऊ शकते, असे सांगितले होते. मात्र, आता तेच प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहेत, हे योग्य नाही.

महागाईविरोधीही आंदोलन करावे

सुनील महाजन म्हणाले, की भाजप आंदोलन करीत आहे. मात्र, आज देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. भाजपने त्याविरोधातही आंदोलन करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT