Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजन जळगावच्या मैदानात लढाईआधीच पराभूत झालेत का?

भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी महाविकास आघाडीने खंजीर खुपसला असा आरोप केला आहे.

Sampat Devgire

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यात खासदार रक्षा खडसे (M. P. Raksha Khadse) आणि माजी आमदार स्मिता वाघ (Ex MLA Smita Wagh) प्रमुख आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे दिग्गज माघारीआधीच बिनविरोध येण्याची शक्यता दिसू लागली आहे. भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत त्यांना हा धक्का मानला जातो. तो हा पराभव स्विकारणार की नवी रणनिती आखणार याची उत्सुकता लागली आहे.

जळगाव जिल्हा सहकारी बॅकेंच्या संचालक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील व ॲड. रवींद्र पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. तर भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचा अर्ज बाद झाला. उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर बुधवार व गुरुवारी सुनावणी घेण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी यामध्ये १३० अर्ज नामंजूर करण्यात आले असून १४९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे सांगितले.

अर्ज बाद केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह तिघांनी निवडणूक अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा अमळनेर विविध कार्यकारी सोसायटी गटातून अर्ज बाद झाला आहे. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांचा अर्ज महिला राखीव गटातून बाद झाला, तर नाना पाटील यांचा अर्ज मुक्ताईनगर गटातून बाद करण्यात आला. ते एकनाथ खडसे यांचे विरोधक आहेत. पतसंस्थचे थकबाकीदार असल्यावरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. मात्र, आपण कोणतेही कर्ज घेतलेले नाही, असा दावा त्यांनी केला.

यासंदर्भात महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून अधिकाऱ्यावर दबाव आणून अर्ज बाद केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी केला. जी. एम. फाउंडेशनच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

आमदार सुरेश भोळे म्हणाले, की भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, सुरेश धनके, भारती चौधरी आदींचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर बाद केले आहेत. अधिकाऱ्यांनी केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झुकते माप दिले आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाखाली काम केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या हरकतींवर भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले. मात्र, आम्ही केलेल्या हरकती फेटाळून लावल्या आहेत. याबाबत आम्ही पुढील न्यायालयीन लढाई लढणार आहोत.

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई आहे. त्यात पहिल्या टप्प्यातच महाजन यांचे प्रतिष्ठेचे उमेदवार गारद झालेत. यासंदर्भात महाविकास आघाडीने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आमच्यासोबत तीन बैठका घेतल्या. त्यांनतर त्यांनी भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अगोदरच आम्हाला नकार कळवायचा होता. ऐनवेळी त्यांनी ही भूमिका घेऊन आमचा विश्‍वासघात केला, असे सांगितले. ही प्रतिक्रीया पाहता राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु म्हणून राजकीय चमत्कार घडविणारे गिरीश महाजन लढाईत उतरण्याआधीच पारभूत होतात की काय अशी चर्चा आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते कोणते डावपेच करतात, याची उत्सुकता आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT