MLA Maulana Mufti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`मालेगाव क्या कश्मीर है, पुलीस आधी रात को दरवाजा खटखटाती है`

मालेगाव दंगलीबाबत पोलिसांनी संशयीतांना पकडण्यासाठी मोहीम उघडली आहे.

Sampat Devgire

मालेगाव : शहरात सध्या पोलिसांनी दंगलीतील संशयीतांना अटक करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे. त्याचा राजकीय नेत्यांनी धसका घेतला आहे. याबाबत शहराचे `एमआयएम`चे आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले, `मालेगाव काय काश्मीर आहे काय?. इथे मध्यरात्री येऊन पोलिस दार ठोठावतात. लोकांना अटक करून नेतात`

मालेगाव बंद दरम्यान गत शुक्रवारी झालेल्या दगडफेक, तोडफोड, खूनाचा प्रयत्न, दंगल व सरकारी कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत. या आरोपावरुन जनता दल नगरसेवक मुश्‍तकिम डिग्निटी तसेच विविध संस्था, संघटनांच्या पाच प्रमुखांसह अडीच ते तीन हजार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी आज माजी नगरसेवक व शहा बिरादरीचे प्रमुख रहेमान शहा, आवामी पार्टीचे अध्यक्ष मोहम्मद रिजवान उर्फ रिजवान बॅटरीवाला या दोघांसह ११ जणांना अटक केली. हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ३३ झाली आहे. यापुर्वी २२ जणांना अटक करण्यात आली होती.

शहर व आयेशानगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात नगरसेवक मुश्‍तकीम, सुन्नी जमेतुल उलेमाचे कारी हारुण अन्सारी, रझा अकॅडमीचे शहराध्यक्ष डॉ. रईस रिझवी, कुल जमाती सुन्नी तंजीमचे युसूफ इलियास, माजी नगरसेवक रहेमान शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अज्जु लसणवाला, कॉंग्रेस प्रवक्ते साबीर गोहर या प्रमुखांचा समावेश आहे. हिंसाचारादरम्यान तीन पोलिस अधिकाऱ्यांसह सात जवान जखमी झाले होते. तर सुमारे नऊ जणांच्या विविध मालमत्तांचे सुमारे ११ लाखाचे नुकसान झाले होते. या नुकसान प्रकरणी पंचनामे करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आल्याचे तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी सांगितले.

पोलिसांनी संशयीतांना अटक करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्याबाबत राजकीय नेत्यांत नाराजी आहे. शहराचे आमदार मौलाना मुफ्ती याबाबत म्हणाले, मालोगाव जसे काही काश्मीर आहे. इथे पोलिस अर्ध्या रात्री येऊन दार ठोठावतात. लोकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेतात. राजकीय नेते, नगरसेवकांवर अतिशय गंभीर कलम लावण्यात येत आहेत. हे योग्य नाही. त्याचा प्रशासनाने फेरविचार करावा.

ते म्हणाले, आठ दिवसांपूर्वी शहरात राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने कोपरा बौठक घेतली. त्यावेळी त्याच्या विरोधात कारवाई झाली नाही. रात्रीतून दगड आणून ठेवले. दगडफेकीत पोलिस जखमी झाले, मात्र त्यांनी गोळीबार केला नाही. आता अचानक पोलिस कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. त्यात पोलिसांनी अतिरेक करू नये.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT