Jaiprakash Chhajed news
Jaiprakash Chhajed news  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jaiprakash Chhajed: ' इंटक'चा आधारवड हरपला; काँग्रेसच्या जयप्रकाश छाजेड यांचं ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन

सरकारनामा ब्युुरो

Jaiprakash Chhajed Passed away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं ह्दयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झालं आहे. ७५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयप्रकाश छाजेड हे नागपूरला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. इंटकच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासह काँग्रेस पक्षात त्यांनी शहर आणि प्रादेशिक पातळीवर अनेक महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली होती. नागपूर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

जयप्रकाश छाजेड हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासूंपैकी एक होते. तसेच देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच त्यांना विधानपरिषदेवर नियुक्ती झाली होती. जयप्रकाश छाजेड(Jaiprakash Chhajed) हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. काँग्रेस पक्षात शहर आणि प्रादेशिक पातळीवर अनेक संघटनात्मक पदं भूषवली होती. इंटक या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष तर राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. आ‍ॅल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं.नाशिकच्या राजकीय व सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.

मागील काही दिवसांपासून जयप्रकाश जितमल छाजेड यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांच्यावर नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. तरीही ते नागपूर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. पण काही वेळातच छाजेड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना कुटुंबियांनी नाशिकमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, तिथंच छाजेड यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नागपूरला कॉंग्रेसच्या बैठकीसाठी गेलेले सर्व पदाधिकारी नाशिकला परतले

जयप्रकाश छाजेड यांच्या पश्चात पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, सुपुत्र प्रीतीश, हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. बुधवारी नाशिकच्या काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तर सायंकाळी सहा वाजता नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT