Jalgaon DCC Bank Election dispute between Mangesh Chavan and Kishor Patil : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार किशोर पाटील आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
पाटील व चव्हाण वादाची धग केवळ जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपुरती मर्यादित न राहाता आगामी जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. दोन्ही आमदारांमधील वाढता संघर्ष मिटवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांनाही अद्याप यश आलेलं नाही.
वरिष्ठ नेत्यांकडून समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाही दोन्ही आमदारांमधील शाब्दिक संघर्ष कायम आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून सुरू झालेला हा वाद वेळीच मिटला नाही, तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीतील समन्वयाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आपली ताकद दाखवली होती. दुसरीकडे, नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी युतीचे सूत्र कायम राहिले, तर काही ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते.
नगरपालिकांचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने स्थानिक आमदारांना आपापल्या भागातील राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेणे शक्य झाले. मात्र, जिल्हा परिषद निवडणूक संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंधित असल्याने प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे युतीचे समीकरण मांडणे किंवा काही ठिकाणी मित्रपक्षांविरोधात लढणे अधिक गुंतागुंतीचे ठरू शकते.
जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अद्याप अधिकृत चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, येत्या काही महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत तीन प्रमुख पक्ष असल्याने जागावाटपावर एकमत घडवून आणणे नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यातच जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने या पदावर प्रत्येक पक्षाचा दावा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाधिक जागा जिंकून बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाऊ शकतात.
महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवून बहुमताचा आकडा गाठला, तरी जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाला अध्यक्षपदाची अपेक्षा असल्याने सत्तास्थापनेच्या वेळी रस्सीखेच होऊ शकते. त्यातच आमदार मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील यांच्यातील सध्याचा संघर्ष कायम राहिल्यास जागावाटपापासून अध्यक्षपदाच्या निर्णयापर्यंत महायुतीच्या नेत्यांसमोरील अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.