Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यापूर्वीच रावेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे संचालकपदाचे उमेदवार रमेश पाटील यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक माघार घेतली आहे.
रमेश पाटील यांनी अशाप्रकारे अचानक माघार घेतल्याने आता भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र चौधरी आणि महाविकास आघाडीचे (उबाठा) उमेदवार योगीराज पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजेंद्र चौधरी, योगीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) रमेश पाटील अशी तिरंगी लढत निश्चित झाली होती. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रमेश पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पण त्यांनी आपला पाठिंबा कोणालाही दिलेला नाही. मतदार ज्या उमेदवाराला योग्य समजतील त्याला ते मत देतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दै. सकाळशी बोलताना व्यक्त केली.
रमेश पाटील यांचे पुत्र सचिन पाटील यांच्याविरोधात भाजपच्याच संचालकांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यामुळे त्यांना रावेर बाजार समितीच्या सभापतिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रमेश पाटील भाजपला साथ देतात की या राजकीय घडामोडींचा वचपा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, त्यावेळी योगीराज पाटील यांनी रमेश पाटील यांना साथ दिली होती. या जुन्या राजकीय समीकरणाचा फायदा आता योगीराज पाटील यांना होतो का, याकडेही लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध संस्थांचे ठराव करताना रमेश पाटील यांनी सक्रिय भूमिका पार पाडली होती. आता त्यांचे समर्थक कोणाच्या मागे उभे राहतात. तसेच रमेश पाटील जाहीरपणे नाही पण आतून कोणाला समर्थन देतात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून असेल.
या तालुक्यात विकास संस्था मतदार संघातील लढत नेहमीच अटीतटीची आणि एक दोन मतांच्या फरकाने जय पराभव झाल्याची आहे. या पार्श्वभूमीवर आता ही लढत अधिकच चुरशीची, अटीतटीची आणि उत्कंठावर्धक होईल यात शंका नाही.
उद्या मतदान
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या उर्वरित नऊ जागांसाठी उद्या (ता.२९) जिल्हाभरात मतदान होत आहे. यापूर्वी बारा जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. आता नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ३० केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन- दोन मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सहकार पॅनल विरुद्ध काँग्रेस- शेतकरी संघटनेचे शेतकरी पॅनल यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान मतदान प्रक्रियेसाठी सुमारे दोनशे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय मनोज चौधरी यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.