Mangesh Chavan | Jalgaon District Bank Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी भाजपची व्यूहरचना, आमदार मंगेश चव्हाण यांच्या खांद्यावर धुरा

Jalgaon District Bank Election : भाजपने यावेळी आपल्या ताकदीच्या जोरावर आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हा बॅंकेवर पूर्ण बहुमताने सत्ता मिळवण्याची व्यूहरचना आखली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या खांद्यावर निवडणुकीची धूरा असणार आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election 2026 : जळगावात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील मंत्री, आमदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने ठराव मंजूर झाले असून त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.

मागील पंचवार्षिक निवडणूक ही २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली होती. याहीवेळाला प्रत्यक्षात, नोव्हेंबर महिन्यात किंवा दिवाळीनंतर निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती म्हणून लढायचे की 'सर्वपक्षीय' बिनविरोधचा फॉर्म्युला राबवायचा, यावरून सध्या खल सुरु आहे.

विशेषत: जळगाव जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे यंदाची निवडणूक अधिक रंजक ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या दूध संघ तसेच महानगरपालिका निवडणुकीत रणनीतीची धुरा यशस्वीपणे हाताळलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरच आता जिल्हा बँक निवडणुकीचीही मुख्य जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

मंगेश चव्हाण हे कामाला लागले असून पक्षाची चाचपणी करण्यासाठी त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आहे. जळगाव शहरात त्यांनी एका माजी मंत्र्यांची रात्री उशिरा भेट घेतली. बंददाराआड तब्बल तासभर खलबते झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात भाजपची सर्वांधिक ताकद आहे. त्यापाठोपाठ शिंदे शिवसेनेची देखील चांगली ताकद आहे. जिल्ह्यात भाजपकडे एक केंद्रीय व राज्यात दोन असे तीन मंत्री आहेत, शिवसेना शिंदे गटाचा एक मंत्री तर दोन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच आमदार आणि विधानपरिषदेतही भाजपचा आमदार आहे. या ताकदीच्या जोरावर भाजपने जिल्हा बँकेवर पूर्ण बहुमताने सत्ता काबीज करण्याची रणनिती आखली आहे.

जिल्हा बॅंकेच्या एकुण 21 संचालकांपैकी निम्म्याहुन अधिक म्हणजे किमान 11 हून अधिक जागा भाजपच्याच असतील असे टार्गेट ठेवण्यात आले आहे. निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी भाजपमधून प्रस्थापित नेते व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरणार आहेत. सर्वपक्षीय वाटाघाटी करायच्या झाल्यास किंवा महायुती म्हणून लढल्यास कोणाला किती जागा सोडायच्या, याची आकडेमोड सध्या सुरू आहे.

महाजन, खडसे चव्हाण यांच्या नावाचे ठराव

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादीतील ठरावांवरून चर्चा रंगली आहे. या यादीत मंत्री-आमदार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावाचे ठराव झाले आहेत. मंगेश चव्हाण यांचा तालुक्यातील हिंगोणे व हिरापूर येथून ठराव असल्याचे प्रारुप मतदार यादीत नमूद आहे. प्रारुप मतदार यादीत मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर तालुक्यातील हिवरखेडा तर त्यांच्या पत्नी साधना महाजन यांचा सुनसगाव येथील संस्थेतून ठराव झाला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे कर्की, कोथळी व घोडसगाव या तीन संस्थांमधून ठराव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT