Jalgaon Municipal Corporation Election : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगाव महापालिकेच्या 2025-26 च्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करूनही निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना आयुक्त गेडाम यांनी मोठा दणका दिला आहे.
आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. तसे आदेशच काढण्यात आले आहेत.
नियमानुसार, निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा संपूर्ण तपशील शपथपत्रासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित उमेदवारांनी ही कार्यवाही मुदतीत पूर्ण केली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अपात्रतेची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली होती.
या प्रकरणी संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली होती. त्यासाठी ११ ऑगस्ट व अंतिम संधी म्हणून 25 ऑगस्ट अशी दोन वेळा सुनावणी घेण्यात आली. परंतु दोन्ही सुनावण्यांना संबंधित उमेदवार उपस्थितीत राहिले नाहीत. त्यामुळे कोणताही खुलासा सादर करण्यात न आल्याने विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची कारवाई केली. (Jalgaon News)
अपात्र करण्यात आलेले उमेदवार असे...
प्रिया मधुकर जोहरे, वृषाली अर्जुन भारुळे, सोनाली मनोहर बाविस्कर, मंदा छोटूलाल सोनवणे, कौशल्याबाई उत्तम निकम, पद्माकर देवचंद सोनवणे, कलाबाई नारायण शिरसाठ, छाया फकीरा अडकमोल, चेतन नाना सोनवणे, शेख अहमद नूर लतीफ, जया रघुनाथ साळुंखे, डॉ. किशोर माळी, अनिल रमेशचंद पगारिया, सोनम रोहिदास सोनवणे आणि अमोल रवींद्र चौधरी यांचा अपात्र ठरलेल्यांमध्ये समावेश आहे.
कारवाईच्या आदेशात १६ उमेदवारी नोंदींचा समावेश असला तरी अनिल रमेशचंद पगारिया यांनी प्रभाग क्रमांक ५ ‘ड’ आणि १३ ‘ड’ अशा दोन प्रभागांतून निवडणूक लढविली होती. त्यामुळे प्रत्यक्षात १५ व्यक्तींवर ही कारवाई झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.