Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या बंडात जळगावचा दुसऱ्यांदा सहभाग

Sampat Devgire

जळगाव : राज्यात (Maharashtra) शिवसेनेचे (Shivsena) पहिले बंड १९९० मध्ये झाले त्यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मूळचे धरणगावचे राहणारे एरंडोल मतदार संघाचे आमदार (स्व.) हरिभाऊ महाजन (Haribhau Mahajan) होते, तर आता झालेल्या बंडातही जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा सहभाग आहे. (Jalgaon Shivsena leader Gulabrao patil joins Eknath Shinde Group)

जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यात अनेकांचे योगदान आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ध्येयामुळे अनेक जण संघटनेकडे ओढले गेले. सत्ता आणि पद हा विषयच त्याकाळी संघटनेत नव्हता. त्यावेळी शिवसेनेने स्वबळावर विधानसभेत काही आमदार उभे केले. त्यात १९९० मध्ये एरंडोल मतदार संघातून शिवसैनिक हरिभाऊ महाजन यांना उमेदवारी दिली. मूळचे धरणगाव येथील ते रहिवासी होते.

त्यांचा या मतदार संघातून मोठा विजय झाला आणि ते शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले आमदार झाले. त्यांचा विजय जिल्हा शिवसेनेला भूषण ठरले होते. त्या वेळी शिवसेना एक कट्टर समजली जात होती.

छगन भुजबळ हे शिवसेनेचे नेते होते. त्यांचा पक्षात दरारा होता. परंतु ते शिवसेनेवर नाराज झाले आणि त्यांनी सेनेचे आमदार फोडून बंड केले. त्यांनी प्रारंभी त्यांच्या सोबत अठरा आमदार होते. मात्र त्यातील बारा जणांनी नकार दिला केवळ सहा आमदारसह त्यांनी सेना सोडली. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, या सहा आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदार संघाचे आमदार हरिभाऊ महाजन यांचा समावेश होता. शिवसेनेचे हे पहिलेच बंड असल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. जळगाव जिल्हा शिवसेनेतही मोठी खळबळ उडाली. त्यावेळी महाजन यांना पोलिस संरक्षणही द्यावे लागले होते.

आता दुसरे बंड

हरिभाऊ महाजन यांनी शिवसेना सोडल्यानंतर सन १९९५ च्या निवडणुकीत तत्कालीन एरंडोल विधानसभा मतदार संघातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिक गुलाबराव पाटील यांना उमेदवारी दिली. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पाटील यांनी ती सार्थ ठरवीत विजय मिळविला. पुढे हा मतदार संघ जळगाव ग्रामीण झाला एक पराभव वगळता गुलाबराव पाटील यांना या मतदार संघातून सलग विजय मिळाला आहे. पक्षाने त्यांना राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्रिपदही दिले. आता राज्यात शिवसेनेत सर्वात मोठे बंड झाले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३६ शिवसेनेचे आमदार फोडून बंड केले आहे.

जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटीलही सहभागी झाले आहेत. तेही मूळ धरणगाव तालुक्यातील लाडली येथील रहिवासी आहेत. त्यामुळे या मतदार संघाचा दुसऱ्या बंडातही सहभाग आहे. स्वत: त्यांनी माध्यमांना सांगितले कि आपण फुटलेल्या आमदारासोबत गुवाहाटी येथे जात आहोत. या शिवाय जिल्ह्यातील शिवसेनेचे पारोळा मतदार संघातील आमदार चिमणराव पाटील, पाचोरा मतदार संघातील आमदार किशोर पाटील व चोपडा मतदार संघातील आमदार लताताई सोनवणे या सुद्धा बंडात सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवसेना आमदार या बंडात असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT