Kishore Patil News: चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली आहेत. मात्र त्यातून नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी उडाली आहे. त्यामुळे महायुतीतच संघर्ष रंगला आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी म्हणून मंगेश चव्हाण सध्या चर्चेत आहेत. चाळीसगावच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड निर्माण केली आहे. मात्र त्यांना विरोधकांऐवजी महायुतीतूनच अडचणी निर्माण केल्या जात आहेत.
चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा आमदार चव्हाण यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जळगावच्या महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार आहे. आमदार चव्हाण यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.
आमदार चव्हाण यांच्या या प्रयत्नाला आधी महायुतीतूनच आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. चव्हाण यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमदार किशोर पाटील हे त्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे हा राजकीय वादाचा विषय ठरला आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. तिसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होत असेल तर होऊ द्या. मात्र त्यात पाचोरा आणि भडगाव हा माझा मतदारसंघ समाविष्ट होणार नाही.
राज्य शासनाने अथवा अन्य कोणी तसा प्रयत्न केल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन होईल. पाचोरा आणि भडगाव हा माझा मतदार संघ कोणत्याही स्थितीत चाळीसगावमध्ये समाविष्ट होणार नाही. त्यासाठी प्रसंगी आमदारकीला लाथ मारण्याची ही आपली तयारी आहे, असा टोकाचा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निमित्ताने महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप यामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत पडद्यामागून तर नगरपालिका निवडणुकीत उघडपणे आमदार चव्हाण आणि आमदार पाटील एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्याचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे, असे म्हणता येईल.
विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमदार किशोर पाटील यांनी भाजपला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने स्वबळावर लढवाव्या. कोणत्याही स्थितीत भाजपसोबत जाऊ नये, असा त्यांचा आग्रह होता.
आता चाळीसगाव येथे होणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्याकडून या राजकारणाला पुन्हा उकळी फुटली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार चव्हाण यांना पुन्हा एकदा किशोर पाटील यांच्या विरोधात जाण्याची एक संधी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीतील सहकारी व शेजारी आमदारांतच राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील यांना भगिनी वैशाली पाटील यांनी घरातूनच आव्हान दिले होते. श्रीमती पाटील सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोडून भाजप पक्षात गेल्या आहेत. त्यामुळे मंगेश चव्हाण यांना किशोर पाटील यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याची एक संधी श्रीमती पाटील यांच्या माध्यमातूनही उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.