Nilesh Patil Joins NCP in Jalgaon : महापालिका निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने जळगावातील बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडली आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करत तडकाफडकी राजीनामा देत अनेक कार्यकर्त्यांसह सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला जळगावात मोठे खिंडार पडले आहे.
जळगावातील शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत रविवार (दि. २५) निलेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.
एकाच महायुतीत सत्तेत असूनही मित्रपक्षात होणारे हे खुले पक्षांतर पाहाता शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेत असताना चुकीची वागणूक आणि अन्याय झाल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले. पक्षाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या आदेशानुसार पक्षाच्या बैठकांना बोलवलं जात नव्हते. निरोप दिले जात नव्हते. मनपा निवडणुकीत उमेदवारी न देता डावललं, पक्षासाठी काम करुनही संधी दिली गेली नाही अशी खदखद व्यक्त करत त्यांनी शिंदे शिवसेनेची साथ सोडली.
निलेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळख प्रस्थापित केली होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर अचानक जिल्हाप्रमुख पदावरून काढल्यामुळे ते पक्षात नाराज होते. जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करुन पक्षाने निलेश पाटील यांना जिल्हा सहसंपर्क प्रमुख केलं होतं.
मात्र, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मतभेदामुळे वर्षभरापूर्वी निलेश पाटील यांनी शिंदे शिवसेनेच्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यानंतर बरीच वाट बघितल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
निलेश पाटील हे जळगाव शहर आणि ग्रामीण भागात आपला मोठा जनसंपर्क ठेवून असलेले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवत त्यांनी पक्ष सोडल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.