Shalarth ID Scam AI Created Image
उत्तर महाराष्ट्र

Shalarth ID Scam : धक्कादायक! SIT च्या झाडाझडतीत जळगावच्या तीन शाळा निघाल्या बोगस; 160 कोटींच्या शालार्थ ID घोटाळ्याला नवे वळण

Shalarth ID Scam : 160 कोटींच्या शालार्थ ID घोटाळ्याचा जळगाव जिल्हा केंद्रबिंदू ठरत आहे. SIT च्या झाडाझडतीत जळगावच्या तीन शाळा बोगस निघाल्या आहेत. याप्रकरणी येथील बड्या संस्थाचालकांना यापूर्वी अटक झाली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Shalarth ID scam : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यातून शासनाची तब्बल 160 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये कायदेशीर मंजुरी किंवा प्रत्यक्षात कोणतीही नियुक्ती नसतानाही शेकडो बोगस व बनावट 'शालार्थ आयडी' तयार करून अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन व अनुदान लाटण्यात आले. बनावट शाळा, अस्तित्वात नसलेले शिक्षक आणि कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्याचे धक्कादायक कारस्थान म्हणजे हा घोटाळा आहे.

या प्रकरणात अनेक बडे मासे जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून तपास आता बोगस शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

नाशिकच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) या प्रकरणाचा तपास सुरु आहे. SIT च्या पथकाने जळगाव जिल्ह्याकडे विशेष फोकस केला आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील बोगस शाळांची संख्या सर्वांधिक असल्याचे समजते आहे. त्यामुळे एसआयटीच्या पथकाने जळगाव जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिले आहे. या घोटाळ्यात ८४१ बोगस शिक्षकांची नियुक्ती झाली. यातील ६३८ बोगस शिक्षक एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा या घोटाळ्याचा केंद्रबिंदू ठरत आहे.

SIT च्या पथकाने गुरुवारी व शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील काही शाळांची अचानक तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, एसआयटीच्या झाडाझडतीत तीन बोगस शाळा आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी पथकाने चोपडा येथील एका खासगी शाळेची झाडाझडती घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजते.

शाळांचे कागदोपत्री बोगस अस्तित्व दाखवून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या का? तसेच बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शासनाकडून वेतन काढण्यात आले का? याची पडताळणी SIT कडून करण्यात आली.

याप्रकरणात धुळे येथील संशयित प्रशांत वाडीले यांना अटक करण्यात आली होती. वाडिले यांच्या अटकेनंतर तपासात समोर आलेल्या संशयित शाळांच्या आधारे ही कारवाई सुरू असल्याचे समजते. या घोटाळ्यात शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. त्या अनुषंगाने फक्त कागदपत्रे असलेल्या शाळांची तपासणी करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर या शहर व तालुक्यातील काही शाळांची देखील लवकरच तपासणी करण्यात येणार असून काही महत्त्वाची माहिती एसआयटीला मिळाली आहे, असेही सूत्रांनी सांगितले. त्यानंतर एसआयटी पथक नाशिक जिल्ह्यातील काही संशयित शाळांकडे देखील आपला मोर्चा वळवणार असल्याचे कळते आहे.

दरम्यान एसआयटीच्या पथकाने येथील शाळा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, की केवळ कागदावरच आहे याची पाहणी केली. शाळेची मान्यता व संचमान्यता तपासली जात असून प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्या आणि शिक्षकसंख्या पडताळणी या तपासणीत करण्यात आली आहे. शिक्षकांच्या नियुक्ती आदेश व वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी कधी आणि कोणत्या आदेशाने काढला, याची पडताळणी पथकाने केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT