jalgaon ZP News : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासकीय सवलतींचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर आता प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून झालेल्या फेरतपासणीचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामध्ये ७१ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ० ते १० टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी ३३ कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र बोगस आढळले होते. आता त्यात आणखी ३८ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारे या कर्मचाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे. त्याचबरोबर, दिव्यांग सेवा-लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली किमान ४० टक्के दिव्यांगत्वाची अट पूर्ण न करणाऱ्या आणखी १३९ कर्मचाऱ्यांचे सर्व संबंधित सेवा-लाभ तातडीने थांबविण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
फेरपडताळणीच्या प्रक्रियेत शिक्षण विभागातील प्रकरणांची संख्या विशेष लक्षवेधी ठरली आहे. आतापर्यंत तपासणी झालेल्या २९७ शिक्षकांपैकी ४० जणांचे दिव्यांगत्व १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व आढळलेल्या ८६ शिक्षकांचे दिव्यांग सेवा-लाभ बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
शिक्षण विभागानंतर ग्रामपंचायत विभागातील प्रकरणेही समोर आली आहेत. फेरतपासणीत १३ ग्रामसेवकांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळले असून, आणखी २९ ग्रामसेवकांना मिळणारे दिव्यांग सेवा-लाभ रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
बडतर्फीच्या नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरु
सर्वोच्च न्यायालयाने बोगस दिव्यांग दाखल्यांच्या आधारे लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अहवाल प्राप्त झाल्यानंतर १२० दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील ३३ कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा बजावल्या असून, नव्याने निष्पन्न झालेल्या ३८ कर्मचाऱ्यांनाही नोटिसा देण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित २१९ कर्मचाऱ्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर बोगस कर्मचाऱ्यांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.