Jamkhed Nag Panchami Yatra : अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा उत्साह सुरू असतानाच जामखेड येथील नागपंचमी यात्रेतील एका प्रकारावरूनराजकीय वाद निर्माण झाला आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या नावाने डीजेवर गाणे वाजवण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शरद पवार राष्ट्रवादीचे (NCP SP) विकास लवांडे यांच्या दाव्यानुसार, जामखेड येथे नागपंचमीनिमित्त 17 ते 20 ऑगस्टदरम्यान झालेल्या यात्रेत घायवळच्या नावाचा उल्लेख करत डीजेवर ‘मैं हूं खलनायक’ हे गाणे वाजवण्यात आले. याच कार्यक्रमाशी संबंधित आणखी एका व्हिडिओत स्टेजवर मुली नृत्य करताना आणि परिसरात युवकांची गर्दी दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, ज्या मंडळाच्या कार्यक्रमात हे गाणे वाजवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी केल्याचे लवांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘सत्तेच्या आशीर्वादाने सर्व काही सुरू आहे का?’ असा सवाल करत लवांडेंनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांवरही निशाणा साधला. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कथित उदात्तीकरण करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याचा संदर्भ देत लवांडेंनी सरकारवरही टीका केली. कर्जत-जामखेडमधील कथित गुंडगिरी गृहखात्याला का दिसत नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच, ‘प्रा. राम शिंदे यांना नीलेश घायवळ यांच्याबद्दल एवढेच प्रेम असेल, तर त्यालाच विधानसभेला उभे करावे,’ असा टोला त्यांनी लगावला. या प्रकरणाची तात्काळ आणि सखोल चौकशी करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही विकास लवांडे यांनी केली आहे.
दरम्यान, नीलेश घायवळचे नाव यापूर्वीही गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आले आहे. मार्च 2026 मध्ये कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा संबंध घायवळ टोळीशी असल्याचे तपासात समोर आल्याचा दावा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.