Judge stand in garbage at sakri hospital.

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

न्यायाधिशाला कचऱ्यात उभे केले, तिथे सामान्यांचे काय होत असेल?

साक्री ग्रामीण रुग्णालयातील घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने आरोग्य विभागाचा बोभाटा.

Sampat Devgire

साक्री : रुग्णालये (Government Hospital) म्हणजे आरोग्यदायी ठिकाण असायला हवे. मात्र सरकारी रुग्णालयांची अवस्था याविषयी न बोललेलीच बरी. धक्कादायक बाब म्हणजे हा अनुभव चक्क एका न्यायाधिशांना घ्यावा लागला. त्यांना आपल्या अंगरक्षक पोलिसासह कोरोना चाचणीला स्वॅब (Swab) घेण्यासाठी चक्क कचऱ्यात उभे करण्यात आले. त्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. न्यायाधिशांची ही गत तर सामान्य नागरिकांच्या वाट्याला काय येत असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

साक्री येथील ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत नेहमीच ओरड होत असते. त्याचा फटका आज चक्क येथील न्यायालयाच्या न्यायाधीशांना देखील बसला. न्यायालयाचे दिवानी न्यायाधीश कैलास अढायके हे ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी गेले असता त्यांना चक्क घाणीचे साम्राज्य असलेल्या जागी उभं राहून स्वॅब द्यावा लागला. यानंतर मात्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारणा करत कारवाईचे सूतोवाच दिले आहेत.

येथील न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश कनिष्‍ठ स्‍तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कैलास अढायके हे कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गावी जाणार असल्याने तत्पूर्वी ते आरटीपीसीआर चाचणीसाठी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांना ग्रामीण रुग्णालय परिसरातील अस्वच्छ, घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी उभे राहून टेस्टसाठीचा स्वॅब द्यावा लागला. स्वॅब घेण्यासाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था त्याठिकाणी नव्हती, तसेच सुरक्षिततेची काळजी देखील घेतली जात नसतानाच, स्वच्छतेची देखील काळजी घेतली जात नसल्याने यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला याबाबत विचारणा केली.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाईचे देखील सूतोवाच त्यांनी यावेळी केले आहे. अपुऱ्या सुविधा, अस्वच्छता, डॉक्टरांची उपलब्धता नसणे, पुरेसे उपचार न मिळणे अशा एक ना अनेक तक्रारी असताना देखील यावर कुठलाही निर्णय होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT