Farmers in Kisan March (File Photo) Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सातबाऱ्यासाठी धडकणार आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा

शिरपूर तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांचा पायी मोर्चा

Sampat Devgire

धुळे : वनहक्क (Forest land) प्रमाणपत्रधारक शेतकऱ्यांना (Farmers) सातबारा उताऱ्याचे लाभ द्यावेत यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा (Kisan sabha) व बिरसा फायटर्सतर्फे येत्या सोमवारी शिरपूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा धुळ्यात (Dhule) पोहोचेल. या मोर्चात हजारावर आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग असेल. त्यामुळे किसान मार्चची पुनरावृत्ती होणार असल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे.

संघटनेचे नेते हिरालाल परदेशी, हिरालाल सापे, किसान सभेचे सचिव वसंतराव पाटील, अर्जुन कोळी, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पाटील, शेतकरी संघटनेचे पोपटराव चौधरी आदींनी पत्रकार परिषदेत मोर्चाबाबत माहिती दिली.

वनजमिनीच्या प्रश्‍नावर १९८७ पासून आंदोलने झाली. २००६ मध्ये वन अधिकार अधिनियम आला. त्यानुसार जमिनी कसणाऱ्यांना वनजमिनीचा हक्क मिळाला. मात्र, या प्रदीर्घ आंदोलनानंतरही जमिनी कसणाऱ्यांना सातबारा मिळालेला नाही. शिरपूर तालुक्यातील ११ हजार १७८ आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या संघर्षानंतर वनहक्क प्रमाणपत्र मिळाले. मात्र, १६ वर्षांपूर्वी कायदा होऊनही सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना पीककर्ज, बँकेचे कर्ज, शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान, गोपीनाथराव मुंडे अपघात विमा आदी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मोजणी होऊन जोपर्यंत सातबारा उतारा मिळत नाही, तोपर्यंत वनहक्क प्रमाणपत्रधारक शेतकऱ्याला सातबारा उताऱ्यावर मिळणारे सर्व लाभ द्यावेत, अशी मागणी आहे.

या मार्गाने जाईल मोर्चा

२६ फेब्रुवारीला सांगवी (ता. शिरपूर) येथून मोर्चाला सुरवात होईल. तेथून करवंदमार्गे शिरपूर. विजयस्तंभाजवळ कॉर्नर सभा. खंडेराव मंदिराकडून खर्दे, उटावद, सावळदे, वर्षी, दमाशीच्या पुढे मोर्चाच्या मुक्काम. २७ फेब्रुवारीला मोर्चाच्या ठिकाणाहून नरडाणा, सोनगीर, कापडणे येथे सायंकाळी सभा व मुक्काम. २८ फेब्रुवारीला कापडण्याहून धुळे येथे श्री एकवीरा देवीचे दर्शन. आग्रा रोडने महात्मा गांधी पुतळा. महापालिकेची जुनी इमारतमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होईल व शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT