Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्याचे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना(शिंदे गटाचे) आमदार किशोर पाटील यांनी राज्यात सर्वात आधी आपल्या मतदारसंघात स्वबळाचा नारा दिला होता. भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. सर्व पक्ष युतीच्या चक्रात अडकले असताना किशोर पाटलांनी स्वबळाची घोषणा देत आपल्या पत्नीच्या प्रचाराचा नारळही फोडला होता.
किशोर पाटलांनी विधानसभेला आपल्या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केल्याचा आरोप करत भाजप नेत्यांना शिंगावर घेतलं. भाजप नेत्यांवर जहरी टीका करत अनेक आरोप केले. भाजपसोबत युती करायची नाही ते कधीही पलटी खाऊ शकतात अशी भूमिका घेतली. त्यांनी पाचोऱ्यात शिवसेना स्वबळावर लढेल अशी घोषणा केली. त्यामुळे पाचोऱ्यात किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे सगळे नेते एकवटल्याचे चित्र आहे.
किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील या पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून त्यांच्यासह १४ प्रभागांमधील २८ उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. २७) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना तुफान बॅटिंग केली. ‘मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन चांगले करतो. दुश्मनो पे करो मात, तुम्हारे साथ खडा एकनाथ’ अशा शब्दांत आमदार किशोर पाटील यांना त्यांनी धीर दिला.
शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात अनेक आगळीवेगळी विकासकामे करत सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. इतरांसोबत नेते असतील, पण आमच्या सोबत जनता आहे. आम्ही सत्तेवर पाणी सोडून नव्हे तर जनतेच्या मनातील सरकार स्थापन केले. विरोधकांची झोप उडवण्यासाठी काम केले. अनेक अडथळ्यांनंतरही दिलेला शब्द पाळला. जनता ही मालक असून आम्ही तिचे सेवक आहोत असे शिंदे म्हणाले.
आमदार किशोर पाटील यांनाही यावेळी राहवलं नाही. त्यांनी पुन्हा या सभेत विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विश्वासघाताचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गिरणा धरणातून ३७० कोटींच्या कर्जाच्या पाणीपुरवठा योजनेचा, शासकीय एमआयडीसीतील उद्योगधंद्यांचा, तसेच गिरणेवर बलूनऐवजी सिमेंट बंधारे उभारण्याच्या प्रस्तावाचा उल्लेख केला. संबंधित कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.