Kopargaon inauguration event : महायुतीत असून, कट्टर प्रतिस्पर्धी! असं असलं तरी, अजेंडा एकच शहर विकास! हाच मुद्दा पकडत भाजपचे युवा नेते तथा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि ज्येष्ठ नेते राजेश परजणे यांच्यासमोर तुफान फटकेबाजी केली.
कोपरगाव शहरातील विकासासाठी स्थानिक पातळीवर म्हणजे नगरपालिका पातळीवर जबाबदारी स्वीकारत, जिल्हास्तरावर आणि राज्य पातळीवर, कोणत्या टप्प्यात कोणाची जबाबदारी आहे, याचं झणझणीत अंजन विवेक कोल्हे यांनी घातलं. कोल्हे यांच्या फटकेबाजीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
विवेक कोल्हे म्हणाले, "कोपरगाव (Kopargaon) शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सरकारी पातळीवर प्रस्ताव पाठवू. हे प्रस्ताव जिल्हास्तरावरून राजेश परजणे, तर राज्यपातळीवर अडचण न येता हे विकासकामे कसे मार्गी लावता येतील, याची जबाबदारी आमदार आशुतोष काळे यांची असेल." मी सत्ताधारी पक्षात आहे. पण सत्तेत नाही. सत्तेत आपल्या सर्वांच्यावतीने आमदार आहेत, याची आठवण कोल्हेंनी करून दिली.
नाईक बिल्डर्स अँड पांडे असोसिएट्सच्यावतीनं उभारण्यात आलेल्या ‘रचना स्क्वेअर’ व्यापारी संकुलाचे उद्घाटन व जिल्ह्यात सर्वाधिक उंच 14 मजली निवासी इमारत भूमिपूजन कार्यक्रमात राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले होते. अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, भाजपचे (BJP) युवा नेते विवेक कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे, कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, ज्येष्ठ दत्तात्रेय कोल्हे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, कोपरगाव-शिर्डी क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे आणि बिल्डर प्रसाद नाईक उपस्थित होते.
विवेक कोल्हे म्हणाले की, "गोदावरी खोऱ्यात पाण्याचे आरक्षण 58 टक्क्यांपर्यंत वाढले असून, सिंचनाच्या पाण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. कोपरगावच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध राहू, असा संकल्प घ्यायला हवा. अनेक शहरांत घरपट्टीमध्ये 100 टक्के शास्ती माफी झाली." आपल्याला देखील संयुक्तिक प्रयत्न करणे अपेक्षित होते. काँक्रिटचे रस्ते, पाणी, डीपी प्लॅन, भूमिगत वीजवाहिनीसह विविध विकासकामे मार्गी लावणार आहोत, असेही कोल्हे यांनी सांगितले.
आमदार आशुतोष काळे यांनी, वाढत्या शहरीकरणात कमर्शिअल कॉम्प्लेक्स काळाची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून कोपरगावचे चित्र बदलत आहे. या कामात लोकप्रतिनिधी म्हणून क्रेडाई संघटनेला माझे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
सप्टेंबरपर्यंत एक कोटी रुपये खर्चून ज्येष्ठांसह सर्वांसाठी अर्धा एकरमध्ये ‘नमो पार्क’ची उभारणी करण्यात येणार आहे. प्रसाद नाईक यांनी केवळ इमारती उभ्या केल्या नाहीत, तर माणसे जोडण्याचे काम केले आहे. शहराच्या वैभवात ते भर घालत आहेत, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.