Kopargaon caste panchayat : मुलीने आपल्या जातीतीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धामोरी येथील नंदीवाले तिरमली जातपंचायतीने कुटुंबाला बहिष्कृत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जातपंचायतीविरोधात चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसांकडे केली आहे.
तक्रारीनुसार, भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या सज्ञान मुलीने प्रेमविवाह केला. हा विवाह (Marriage) जातपंचायतीच्या नियमांविरुद्ध असल्याचे सांगत तो अमान्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अहिरे कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, त्यापैकी 50 हजार रुपये कर्ज काढून जातपंचायतीला दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
अहिरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, सुया-फण्या विकून पालामध्ये ते उपजीविका करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उर्वरित दंडाची रक्कम देऊ न शकल्याने कुटुंबाला सामाजिक (Social) बहिष्काराला सामोरे जावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अहिरे कुटुंबाशी कुणीही बोलू नये, त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगांना उपस्थित राहू नये, तसे केल्यास संबंधित व्यक्तीलाही दंड करून जातीबाहेर काढले जाईल, असा आदेश जातपंचायतीकडून देण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच अहिरे कुटुंबाला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास बंधने घातल्याचा आणि त्यांच्या मुलीला भेटण्यासही अडथळा आणला जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. जातपंचायतीने कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी होणे अपेक्षित आहे.
या प्रकरणी मुलीचे वडील भाऊसाहेब अहिरे यांनी, आम्ही जे केले ते न्यायव्यवस्थेच्या चौकटीत आहे. तरीही जातपंचायतीने आम्हाला दंड करून बहिष्कृत केले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पीडित कुटुंबाने या प्रकाराची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे दिल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर कृष्णा चांदगुडे आणि डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडित कुटुंबाला सोबत घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले.
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देऊन सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण करण्यासंबंधीच्या कायद्यानुसार जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल करावा आणि प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच संबंधित आरोपांबाबत पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.