Kopargaon Nagar Parishad Election Result Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kopargaon Nagar Parishad Election Result : दोन उपमुख्यमंत्री, आमदार अन् अदृश्य शक्तीला थोपवलं; विवेक कोल्हेंनी देवाभाऊची विजय रॅली केली फिक्स!

Kopargaon Municipal Election: BJP Vivek Kolhe and Snehalata Kolhe Defeat Ajit Pawar NCP Candidate : कोपरगाव नगरपालिकेवर भाजपने एक हाती सत्ता मिळवत युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपली राजकीय चुणूक दाखवून दिली.

Pradeep Pendhare

Kopargaon Municipal Election : कोपरगाव निवडणुकीत राज्याचं लक्ष लागलं होतं. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रचारसभांनी निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मतदानाच्या दिवशी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने हाय-व्होल्टेज ड्रामा रंगला होता.

या राजकीय धुरळ्यात संयमाची भूमिका घेत, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी पुन्हा एकदा राजकीय चुणूक दाखवली. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपचे 19 नगरसेवक निवडून आणत, नगराध्यक्षपदही पराग संधान यांच्या रूपानं खेचून घेतलं. याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, प्रचारसभेवेळी विजय रॅलीला पुन्हा येईल, असा शब्द दिला होता. विवेक कोल्हे यांनी हा विजय साकारून, देवाभाऊ यांची विजय रॅली आता फिक्स केली आहे.

कोपरगाव (Kopargaon) नगरपालिकेच्या एकूण 30 जागांपैकी 19 जागांवर भाजपने विजय मिळवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं. ही निवडणूक आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रतिष्ठेची केली होती. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे पराग संधान आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कोयटे यांच्या लढत रंगली. यात पराग संधान यांना 18,503 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काका कोयटे ऊर्फ ओमप्रकाश यांना 18,094 मत मिळाली. संधान यांनी कोयटे यांचा 409 मतांनी पराभव केला.

कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक न्यायालयात गेली होती. त्यामुळे ती लांबणीवर पडून 20 डिसेंबरला मतदान झाले. ही निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रतिष्ठेची केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा झाली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपपाल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक थेट राज्य पातळीवर पोहोचली.

या निवडणुकीत सर्व राजकीय डावपेच पाहायला मिळाले. परंतु विवेक कोल्हे यांनी राजकीय चुणूक दाखवत, नगरपालिकेची सत्ता खेचून घेतली. राष्ट्रवादीचे ऐनवेळी काका कोयटे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले. काका कोयटे हे भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक. त्यामुळे निवडणुकीत वेगळीच चर्चा रंगली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभेवेळी स्टेजवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे कोपरगावची निवडणुकीत ऐन थंडीत तापली.

मतदानादिवशी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मतदानादिवशी देखील भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळला होता. हाणामारी झाल्याने वातावरण तापलं होतं. आमदार आशुतोष काळे यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. तसंच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील मतदान केंद्रावर धाव घेतली. बोगस मतदानाचा आरोपाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने येत, हाणामारी झाली. इथं पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवलं होतं.

कोल्हेंनी आका म्हंटलं होतं

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नगराध्यक्षपदासाठी ऐनवेळी काका कोयटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यावरून भाजपचे विवेक कोल्हे चांगलेच आक्रमक झाले अन्, त्यांनी थेट पत्रकार परिषदेत 'काका'चा 'आका' कोण आहे? तालुक्या बाहेरच्या शक्तींना सक्रिय होऊ न देण्यासाठी कोपरगावंकरांना आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरगावमधील प्रचार सभेवेळी मंत्री विखे पाटील अन् कोल्हे यांच्यातला राजकीय संघर्ष समोर आला होता. विवेक कोल्हे यांनी सभेत, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन मंत्री आपल्याला लाभले आहेत. दोन्ही मंत्र्यांनी आपल्यावर जरी कमी प्रेम केलं, तरी मुख्यमंत्री ते भरून काढतील,' असा टोला लगावला होता.

मंत्री विखेंची आका शब्दावर नाराजी

मंत्री विखे पाटील यांनी सभेत, विवेक कोल्हे यांनी 'आका'चा केलेल्या उल्लेखाचा संदर्भ घेत, "निवडणुकीमध्ये थेट समोर गेलं पाहिजे. किंतु-परंतु मनामध्ये नको. तुम्ही मला 'आका' म्हणा, काहीही म्हणा, मला काहीच फरक पडत नाही. पण एकदा 'आका'च्या मनामध्ये आल्यावर, तर आपण काहीही करून दाखवू शकतो. त्यामुळे आपण आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, याला मर्यादा पाहिजेत," असं सुनावलं होतं.

मंत्री विखेंचा नगराध्यक्षपदाबाबत विश्वास

यानंतर कोपरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला होता. तसंच भाचीच्या (स्नेहलता कोल्हे) मनामध्ये शंका ठेवायचा कारण नाही. मामा विषयी ती शंकाच घेत असते. मामावर बोलत असते. तो तिचा अधिकार आहे. मामा शांत स्वभावाचा आहे, सहन करतो सगळं, असेही म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT