Ladki Bahin Yojana Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा निधी वळवला, तरीही ते २५ आमदार अजूनही गप्पच?

Ladki Bahin Yojana faces backlash as tribal welfare funds diverted again in Maharashtra : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. तिसऱ्यांदा हा निधी वळविला जात असताना राज्यातील २५ आदिवासी आमदार व नेते गप्प का आहेत? असा सवाल केला जात आहे.

Ganesh Sonawane

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. याआधीही दोन वेळा आदिवासी विभागाचा निधी या योजनेसाठी वापरण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा हाच निधी लाडकी बहिण योजनेसाठी वर्ग करुन निती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनाही दुजोरा न देता निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. मात्र नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही. नीती आयोगाने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवलेल्या पत्रात या संदर्भात स्पष्ट नियमावली दिलेली आहे.

दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये यासाठी नीती आयोगाने नियमावली जारी केली होती. ती नियमावली केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवली असून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही हे पत्र पाठविण्यात आलेलं आहे. या नियमानुसार हा निधी इतर कोणत्याही योजनेसाठी वापरता येणार नाही. जर या योजनांसाठी अधिकचा निधी द्यायचा असेल तरच तो त्या विभागाच्या लाभार्थ्यांना देता येतो.

आदिवासी समाजाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, समाजाला माझी विनंती आहे, मी आवाहन करतो. आमचे आदिवासी विकास मंत्री व आम्ही सगळे आदिवासी आमदार बारकाईने लक्ष ठेवून आहोत. समज-गैरसमज होत असतात. पसरवले जातात. पण, आम्ही आपल्या ९. ३५ टक्केच्या बजेटमधील एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही.

मूळ रकमेला कुठेही हात लावलेला नाही. निती आयोगाच्याच मताचे आम्ही आहोत. कारण निती आयोगच आमच्यासाठी भांडत आहे. निती आयोगाने ठरवून दिलेलं आजपर्यंतचे ९.३५ टक्क्यांचे जे काही बजेट जवळपास ५३ ते ५४ वेळा ८३ सालापासून आतापर्यंत बजेट झालंय. प्रत्येक वेळेला मायनस मायनस राहिले आहे. मात्र मधली एक-दोन वर्ष सोडली तर येत्या दहा वर्षांपासून प्रत्येक बजेट आम्ही प्लस करुन घेतलं आहे. कुठलाही धोका होणार नाही. निती आयोगाने ठरवून दिलेल्या बजेटला कुठेही हात लावलेला नाही असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आदिवासींच्या निधीवर नरहरी झिरवाळ साहेब लक्ष ठेवून आहेत. ते आदिवासींच्या विकासासाठी साहेब रात्रदिवस झटत आहेत. साहेब कुठेही आदिवासींना निधी कमी पडू देणार नाही असा आम्हा सर्व आदिवासी २५ आमदारांना विश्वास असल्याचं आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटंल आहे.

माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आदिवासी विकास खात्यात जो बजेट दिला जातो. तो बजेट मुळात या पद्धतीने अन्य ठिकाणी वळती करणं हे आदिवासी विकास हे जे नाव आहे, त्याला काळिमा फासण्यासारखं आहे. आदिवासींचा विकास करण्यासाठी आपण बजेट देत असतो. उदाहरणार्थ १२ हजार कोटींचं बजेट दिलं तर आदिवासी विकास खात्यामधले जे आश्रमशाळेतील शिक्षकांचा पगार, बिल्डिंग बांधकाम व सर्व प्रशासकीय खर्च जो आहे तो सर्व आदिवासी विकास खात्याच्या एकुण विकासमधील जो निधी आहे त्यासाठी वापरला जातो. आदिवासींच्या विकासासाठी फार अल्पनिधी शिल्लक राहत असतो. त्यातूनही जर अन्य योजनेसाठी हा निधी वळता केला जात असेल तर आदिवासींच्या विकासाबाबत केलेली ही थट्टा आहे. असच जर करत राहिले तर पुढचे हजारो वर्षही आदिवासींचा विकास होणार नाही असं पाडवी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT