MLA Dilip Bankar & Ex MLA Anil Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

APMC elections; निवडणुकांना पुन्हा स्थगितीमुळे इच्छुकांना मनस्ताप!

सहकार प्रधिकरणाचे पत्र; नागपूर खंडपीठातील ३ जानेवारीच्या सुनावणीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष

Sampat Devgire

नाशिक : राज्यासह (Maharashtra) जिल्ह्यातील नाशिक (Nashik) वगळता १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMC) निवडणूक कार्यक्रमांतर्गत आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार होती. असे असतानाच बाजार समित्यांच्या निवडणुकांना काल पुन्हा स्थगिती देण्यात आली. त्यामुळे वारंवार स्थगित होणाऱ्या या निवडणुकांतील इच्छुकांना मनस्ताप होऊ लागला आहे. (APMC elections postpone once again due to Nagpur court orders)

नागपूर खंडपीठात झालेल्या ४४ बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत ३ जानेवारी २०२३ पर्यंत निवडणुका स्थगित ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यांसह इतर याचिकांच्या आधारावर सहकार प्राधिकरणाने राज्यातील सर्व बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याबाबत कळविले आहे.

राज्यासह जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. यात २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होऊन २९ जानेवारी २०२३ ला बाजार समितीसाठी मतदान होणार होते. असे असताना जिल्ह्यातील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.

नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तीन तालुक्यांतील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून, या निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल. नाशिक बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका तालुक्यातील सदानंद नवले यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आलेले असताना दुसरीकडे लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड व कळवण बाजार समित्यांसह राज्यभरातील ४० बाजार समित्यांनीदेखील नागपूर खंडपाठीत याचिका दाखल केली होती. या याचिकेत झालेल्या सुनावणीत निवडणुका ३ जानेवारी २०२३ पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश २१ डिसेंबरला देण्यात आले. या संदर्भासह विविध याचिकेवरील सुनावणीचा संदर्भ देत सहकार प्राधिकरणाने राज्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारी २०२३ पर्यंत स्थगित करत असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना दिले आहे. नाशिक उपनिबंधक कार्यालयास सदर पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे १३ बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला आहे.

३ जानेवारीच्या सुनावणीकडे लक्ष

बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारीपर्यंत घेऊ नये, असे आदेश असल्याने स्थगित आहे. राज्यभरातून विविध बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिका तसेच राज्य शासनाच्यावतीने देखील नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रक दाखल केले आहे. यावर ३ जानेवारी २०२३ ला अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. यातच निवडणुका पुढे घ्यायचा की नाही, याबाबत आदेश मिळू शकतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT