Nashik News : भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे २५ वे राज्य अधिवेशन नाशिकमध्ये सुरु आहे. डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निर्धार केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मागे पडलो आहोत. डाव्या आघाडीची एकजूट हाच वर्तमान परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी एकमेव उत्तर आहे. असा सूर अधिवेशनात उमटला. माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, उदय भट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, लाल निशाण पक्षाचे भीमराव बनसोड, राष्ट्रीय सचिव अमरजित कौर, राज्य सचिव भालचंद्र कांगो, राम बाहेती व राजू देसले यावेळी उपस्थित होते.
आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष जिवंत राहील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या कष्टकऱ्यांच्या पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे. तरुणांना तातडीने पक्षाच्या राजकारणात सामील करून घेतले पाहिजे, असे आवाहन शेकापचे जयंत पाटील यांनी केले.
पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रातील सामाजिक रचना बदलत आहे, त्याप्रमाणे आपणही आपल्या कामांमध्ये बदल करावा. वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते घडविताना तरुणांना व महिलांना संधी द्यावी. कम्युनिस्ट पक्ष हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुन्हा एकदा लाल बावट्याची ताकद महाराष्ट्राला दाखवून देऊ.
सध्या सत्ताधारी सरकार शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या विरोधात काम करत आहे. सत्तेचा गैरवापर करून या वर्गांची पिळवणूक सुरू आहे. आणीबाणीनंतर जनसंघाच्या विचारसरणीच्या लोकांनी शासकीय व्यवस्थेत वरच्या पदांपर्यंत पोहोच मिळवली, आणि आज आपण त्याचे परिणाम भोगतो आहोत. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं लागेल. आपल्या वर्गीय संघटना सध्या दुर्बल होत आहेत, त्यांना अधिक मजबुती द्यायला हवी असं ते म्हणाले.
सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम भाजपकडून होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद जोपासत आहे. सर्वांचा बीमोड करण्यासाठी सर्व डाव्यांनी एकत्र येऊन मजबूतपणे भाजपचा पराभव करावा असे आवाहन माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी यावेळी केले.
जगात युद्ध सुरु आहे. इराणच्या अणुभट्ट्यांवर हल्ला करुन तिसऱ्या महायुद्दाकडे जगाला ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत शांततेसाठी जनमत एकत्रित करण्याची जबाबदारी डाव्या आघाडीवर असल्याचे मत लाल निशाण लेनिनवादीचे सरचिटणीस भीमराव बनसोड यांनी व्यक्त केले.
लोकशाही. संविधान, फॅसिझम, कामगार, शेतकरी यापैकी ज्याला ज्या योग्य मुद्द्यावर भाजपचा विरोध करायचा आहे. तो त्यांनी करावा. साम्राज्यवाद, कॉर्पोरेट व राजकीय शक्तीशी लढताना एकजूट महत्त्वाची आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून ती बळकट व उत्साहवर्धक राहील. असे मत भाकप माले लिबरेशन चे उदय भट यांनी मांडलं.
धोरणात्मक मुद्द्यांवर संघटन आवश्यक आहे. यातून निर्माण झालेली एकजूट ही दीर्घकालीन फायद्याची असते. भांडवलदारांसमोर डाव्या आघाडीची एकजूट आवश्यक आहे. संविधान, शोषित, पीडितांवर हल्ले करणारे सरकार आहे. असं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.