Ahilyanagar News : संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातून गळती लागली आहे. अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे पक्षातील माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. असे असताना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रयत्न केला.
पण त्यात त्यांना काही यश आले नाही. परंतु शिंदेच्या शिवसेनेत चाललेल्या माजी नगरसेवकांनी अंबादास दानवे यांनाच, 'साहेब. तुम्हीही आमच्यासोबत चला', अशी ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. दानवेंसोबत झालेल्या बैठकीत असलेल्या माजी नगरसेवकांनी या माहितीला दुजोरा दिला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) यश मिळाले. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राज्यात 57 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला राज्यात 20 जागा मिळाल्यात. महायुतीच्या सत्तेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विस्ताराचे धोरण ठरवले आहे.
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातून चांगलीच गळती लागली आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्यांना जायचे असेल, त्यांनी खुशाल जावं, असे म्हटले आहे. असे असले, तरी या शिवसैनिकांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे पक्षातील माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुढील दोन दिवसांत प्रवेश होत आहे.
या पक्षप्रवेशानंतर अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचा दबदबा राहिला आहे. हे सर्व माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत निघून गेल्यावर शिवसेना ठाकरे पक्ष संपूर्ण रिकामा होईल. या माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली.
अंबादास दानवे आणि नाराज माजी नगरसेवकांची जवळपास तासभर चर्चा झाली. संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांच्यासह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीवेळी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर शहर मतदारसंघावर केलेल्या अन्यायावर नाराजी व्यक्त केली. या काळात संजय राऊतांनी वेळोवेळी केलेला अपमान विसरणार नाही, अशी कैफियत काही माजी नगरसेवकांनी अंबादास दानवे यांच्यासमोर मांडली.
माजी नगरसेवकांच्या तक्रारीच्या पाढ्यासमोर अंबादास दानवे शांत बसून राहिले. त्यानंतर माजी नगरसेवकांपैकी काहींनी, 'साहेब, तुम्हीही आमच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेत चला', अशी ऑफर दिली. यावर शांत बसून असलेल्या दानवेंसह सर्वांचा एकच हशा झाला. यानंतर नाराज नगरसेवकांबरोबर अंबादास दानवेंच्या दिलखुलास चर्चा रंगल्या. या सर्व माजी नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेत पुढील दोन दिवसांत मुंबईत पक्षप्रवेश असणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मोठा मेळावा होईल, असे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.