LIC loan controversy : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) जामखेड शाखेत ग्राहकाच्या पॉलिसीवर त्याच्या संमतीशिवाय लाखो रुपयांचे कर्ज काढल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. जामखेड येथील महेंद्र आजिनाथ बारस्कर यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, त्यांच्या 25 लाख रुपयांच्या पॉलिसीवर कोणतीही पूर्वकल्पना न देता 10 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, एलआयसीच्या जामखेड शाखेचे अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर संपर्क साधूनही यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.
बारस्कर यांच्या म्हणण्यानुसार, कर्ज काढताना त्यांची स्वाक्षरी किंवा अंगठा घेण्यात आलेला नाही. तसेच मूळ पॉलिसी बॉण्डही जमा करण्यात आलेला नसताना कर्ज प्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, 19 एप्रिल 2022 रोजी कर्जाची 10 लाख रुपयांची रक्कम LIC जामखेड शाखेतील एका कर्मचाऱ्याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथील वैयक्तिक खात्यात वर्ग झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या कथित गैरव्यवहाराबाबत बारस्कर गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगतात. LIC अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी काही ग्राहकांच्या पॉलिसींवरही अशाच पद्धतीने कर्ज (Loan) काढण्यात आल्याची चर्चा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
बारस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत कथित कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कर्जासाठी वापरण्यात आलेला लोन फॉर्म, स्वाक्षऱ्या, KYC कागदपत्रे आणि बँक खात्यातील व्यवहारांची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच या प्रकरणात तथ्य आढळल्यास संबंधित LIC कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पॉलिसीवरील कथित कर्जाची नोंद रद्द करून पॉलिसी पूर्वस्थितीत आणावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
“माझ्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मला त्रास दिला जात असून, इतर ग्राहकही दबावाखाली गप्प असल्याची माहिती आहे. या प्रकाराविरोधात मी माघार घेणार नाही,” असा इशारा महेंद्र बारस्कर यांनी दिला आहे.
या प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याचा संशय तक्रारदारांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे का, इतर किती ग्राहक प्रभावित आहेत आणि कर्ज व्यवहारात नेमकी कोणाची भूमिका आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची तयारी बारस्कर यांनी केली आहे. LICचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करणार का? तसेच संबंधित व्यवहारांची स्वतंत्र तपासणी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.