Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar News : शरद पवारांनी मोदी सरकारचा पंचनामाच केला !

Sampat Devgire

Nashik Political News : केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अक्षरशः पंचनामा केला. मोदी यांनी राजकीय स्वार्थासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात 'ईडी'चा गैरवापर करून प्रचंड त्रास दिला. त्याचा हिशेबच शरद पवार यांनी सादर केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार यांनी गेल्या वीस वर्षांतील 'ईडी' तपास यंत्रणेच्या कामकाजाचा हिशेब मांडला.

यामध्ये २०१४ नंतर सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदी (Modi) यांनी या यंत्रणेचा सर्वाधिक दुरुपयोग केल्याचे त्यांनी सप्रमाण मांडले. ज्या लोकांनी भाजपत प्रवेश केला त्यांचा तपास थांबविण्यात आला. या कालावधीत भाजपच्या एकाही नेत्यावर 'ईडी'ची कारवाई झाली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar News in Marathi)

सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या कारवाईत किती जणांना शिक्षा झाली हा गंभीर प्रश्न आहे, असे पवार म्हणाले. कारण केवळ त्रास देण्याच्या हेतूने या कारवाया झाल्याचे उघडकीस आले आहे. कारवाई झालेल्यांमध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, 14 मंत्री, 24 खासदार, 21 माजी खासदार, 7 माजी आमदारांचा समावेश आहे.

यातील एकही भाजपचा (BJP) नाही. कारवाई केलेल्या लोकांबाबत केवळ 0.45 टक्के लोकांना न्यायालयाने दोषी ठरविले. याचा अर्थ या नेत्यांना तुरुंगात थांबवायचे, चौकशीच्या नावाने त्रास द्यायचा हा एकमेव हेतू दिसून येतो.

जे लोक भाजपमध्ये गेले त्यांची चौकशी थांबविण्यात आली आहे. उदा. हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक अशी अनेक नावे आहेत. अनेक लोकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत, अनिल देशमुख आदी नेत्यांचा त्यात समावेश आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात तर केवळ एक त्यांच्या शैक्षणिक संस्थेने देणगी घेतली हा प्रकार होता. मात्र, या कालावधीत त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. जेलमध्ये राहावे लागले. असे प्रकार राजकीय हेतूने झाले हे वेगळे सांगायला नको, असेही पवार म्हणाले.

2003 ते 2013 या कालावधीत केंद्रात 'यूपीए'चे सरकार होते. त्यात आम्ही सत्तेत होतो. या कालावधीत 'ईडी' कडून 21 केसेस झाल्या. या कालावधीत फक्त तीन भाजपशी (Bjp) संबंधित नेत्यांवर ईडीची कारवाई झाली.

सध्याचे सरकार 2014 मध्ये सत्तेत आले. त्यानंतर ईडीने 121 जणांविरोधात चौकशी व कारवाई केली. यामध्ये 115 लोक विरोधी पक्षांचे नेते होते. यामध्ये काँग्रेस (Congress) 24, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी काँग्रेस 11, शिवसेना 8, डीएमके 6, बीजू जनता दल 6, राष्ट्रीय जनता दल 5, समाजवादी पक्ष 5 आदी पक्षनेत्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT