dada bhuse  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : शिवसेना की राष्ट्रवादी, नाशिकचा गड कुणाकडे? भुसे म्हणाले...

Sampat Devgire

Nashik News : नाशिक मतदारसंघातील ( Nashik Lok Sabha Constituency ) जागावाटप आणि उमेदवाराबाबत मंगळवारपासून ( 30 एप्रिल ) महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. आता वेळ शिल्लक नाही. त्यामुळे महायुती उमेदवार केव्हा जाहीर करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) यांच्या हस्ते आज ध्वजवंदन झाले. यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी जिल्ह्यातील तेरा आमदार आणि आम्ही सर्व जोमाने काम करणार आहोत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री भुसे म्हणाले, "नाशिक मतदारसंघ सुरुवातीपासून शिवसेना शिंदे गटाकडेच होता. या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या जागेचा आग्रह कायम ठेवला होता. काही अंतर्गत विषयांमुळे याबाबतचा निर्णय होण्यास विलंब झालेला आहे. मात्र, आता त्यावर तोडगा निघालेला आहे. आज सायंकाळपर्यंत सगळ्यांना गोड बातमी मिळेल."

"नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. ही जागा शिवसेनेचा शिंदे गटाकडेच असेल. त्यामुळे आमचा पक्ष निवडणुकीत अतिशय जोमाने उतरेल. उमेदवार जाहीर झाल्यानंतर सायंकाळपर्यंत उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचलेले असेल," असा दावा भुसेंनी केला.

"शांतिगिरी महाराज यांच्याशी चर्चा नाही"

शांतिगिरी महाराजांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यासोबत एबी फॉर्म जोडलेला नव्हता. त्यामुळे शांतिगिरी यांना शिंदे गटाची उमेदवारी मिळणार काय? यावरून वाद सुरू आहे. यावर पालकमंत्री भुसे म्हणाले, "शांतिगिरी यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झालेली नाही. उमेदवारी अर्ज कोणीही भरू शकतो. मात्र, एबी फॉर्म असल्याशिवाय अधिकृत उमेदवार ठरत नाहीत." त्यामुळे शांतिगिरी यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत त्यांनी कानावर हात ठेवले.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT