Fake School ID Scam | Maharashtra Education Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

School ID Scam : उपसंचालकाने एका शिक्षकाकडून केली तब्बल 3 लाखांची वसुली; शिक्षण विभागातील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश

Maharashtra Education Scam : शिक्षकांकडून एका स्कूल आयडीसाठी तब्बल तीन लाख रुपयांची वसुली केली जात होती. या माध्यमातून बोगस नियुक्ती व शासकीय अनुदानाची लूट झाली. शिक्षकांकडून 18 ते 20 कोटी रुपये भाऊसाहेब चव्हाण याला मिळाल्याची माहिती आता तपासातून समोर आली आहे.

Sampat Devgire

Nashik News, 08 Sep: राज्यभर गाजत असलेल्या बनावट स्कूल आयडी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शिक्षक उपसंचालकाने १८ ते २० कोटींची माया गोळा केली आहे. उत्तर महाराष्ट्र १९० कोटींचा बनावट स्कूल आयडी घोटाळा पुढे आला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण उपसंचालकांसह तीन शिक्षण अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. या सर्वांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. नाशिक पोलिसांच्या एसआयटीने या तपासात धक्कादायक खुलासा केला आहे. नाशिकचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हेच या प्रकरणाचे मास्टरमाइंड निघाले. त्यांनी कोट्यावधींची माया गोळा केली आहे.

शिक्षकांकडून एका स्कूल आयडीसाठी तीन लाख रुपयांची वसुली केली जात होती. या माध्यमातून बोगस नियुक्ती व शासकीय अनुदानाची लूट झाली. शिक्षकांकडून 18 ते 20 कोटी रुपये भाऊसाहेब चव्हाण याला मिळाले. उपसंचालक चव्हाण सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी नासिक रोड न्यायालयात प्रयत्न केले. मात्र जामीन फेटाळल्याने त्याने सध्या मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

भाजप नेता आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख दीपक गरुड आणि त्याच्या भावाला यापूर्वीचा अटक झाली आहे. दीपक गरुड यांच्या माध्यमातून 12 बनावट शिक्षण संस्था उघडण्यात आल्या. त्यात शिक्षकांच्या नियुक्ती व वेतन अनुदानात भ्रष्टाचार झाला.

नाशिकच्या एसआयटीने यासंदर्भात लॅब असिस्टंट तुषार साळुंके याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती मिळाली. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी हेच बनावट आयडी घोटाळ्याचे प्रायोजक होते. या घोटाळ्यात 821 शिक्षकांची बोगस नियुक्ती झाली. त्यातील सुमारे 600 शिक्षक उत्तर महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन बोगस आयडी देण्यात आला. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आता अधिक वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT