Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात उपजिल्हाधिकारी (वर्ग अ) संवर्गातील एक पद निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक कुंभनगरीत देश-विदेशातून कोट्यावधी भाविक दाखल होतील. त्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रोटोकॉलची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या स्वागत अधिकारी पदास मंजुरी दिली आहे.
दरम्यान, नाशिकसाठी कायमस्वरूपी स्वागत अधिकारी नियुक्त करण्याची जिल्हा प्रशासनाची मागणी शासनाने फेटाळली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात येणारे उपजिल्हाधिकारीपद, हे केवळ १ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीपुरतेच मर्यादित राहणार आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले स्वागत अधिकारी (वर्ग-३) हे पद १ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी (वर्ग-अ) पदामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर आणि विविध शासकीय प्रतिनिधींच्या वाढत्या भेटींचे नियोजन, प्रोटोकॉल व समन्वय प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार एस-२० वेतनश्रेणी लागू राहणार असून, वार्षिक अंदाजित खर्च सुमारे १४.०१ लाख रुपये इतका अपेक्षित आहे. हा खर्च विद्यमान स्वागत अधिकारी पदासाठी उपलब्ध निधीतून भागविण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार हे पद केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीपुरतेच अस्तित्वात राहील. ३१ ऑगस्ट २०२८ नंतर हे तात्पुरते पद आपोआप रद्द होऊन त्याऐवजी पूर्वीप्रमाणे स्वागत अधिकारी (वर्ग-३) हे पद पुन्हा कार्यरत राहील.
दरम्यान नाशिक जिल्हा हा धार्मिक नगरी म्हणून ओळखला जातो. पर्यटनदृष्ट्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी नाशिक हा एक जिल्हा आहे. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेली सप्तशृंगी देवी (वणी), चांदवडची रेणुका माता, तसेच शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रमुख मार्ग म्हणून वर्षभर देश-विदेशातील VVIP लोकांची नाशिकमध्ये सतत वर्दळ असते.
याशिवाय केंद्र तसेच राज्य सरकारचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि विविध मान्यवर सार्वजनिक कार्यक्रम, बैठका व शासकीय दौऱ्यांसाठी नियमितपणे नाशिक जिल्ह्यात येत असतात. या सर्वांच्या प्रोटोकॉलची जबाबदारी महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांचा मोठा वेळ त्यात खर्च होतो. परिणामी, महसूल कार्यालयांतील दैनंदिन कामकाज आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे अनेकदा विलंबाने होत असल्याची तक्रार वारंवार पुढे येत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर नाशिकमध्येही कायमस्वरूपी उपजिल्हाधिकारी दर्जाचे स्वागत अधिकारी पद निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला होता.
मात्र, शासनाने या प्रस्तावास मंजुरी न देता केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कुंभमेळ्याच्या काळात VVIP प्रोटोकॉलची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्याकडे राहणार असून महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, कुंभमेळा संपल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रोटोकॉलची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे नाशिकला कायमस्वरूपी स्वागत अधिकारी कधी मिळणार? हा प्रश्न कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.